Breaking News

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा होणार शक्ती प्रदर्शन

विरोधी पक्षांना तळातून हुसकावण्याची भाजपची व्युहरचना

अहमदनगर, दि. 24, सप्टेंबर - लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळविल्यानंतर भाजप आता तळातील म्हणजे ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी नियोजन करू लागले आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 205 ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी  भाजपचे प्रयत्न राहीतील. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसही काय करणार आहे,शिवसेनेची भूमिका कशी  राहील यावर भाजपचे ग्रामीण भागातील चित्र अवलंबून राहील , असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.  गेल्या काही महिन्यापासून भाजप व शिवसेनेचे संबंध नको तितके ताणले गेल्याने शिवसेना पूर्ण ताकदीने भाजपविरूद्ध उभा राहील असे काहींचे म्हणने आहे.
त्यामुळे भाजपला विरोधी पक्षापेक्षा शिवसेनेशी जुळवून घ्यावे लागण्याची शक्यता आहे. सत्तेत  असूनही शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका घेत  असल्याने शिवसेना समर्थकांमध्ये चलबिचल आहे. परंतु विरोधी पक्षांना भाजप-सेना यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते पाहता पुन्हा आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांना संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या पक्षाने मरगळ झटकणे गरजेचे आहे. .यंदा सरपंच पदाच्या वेगळ्या निवडणुका होत असल्याने भाजपचा प्रामुख्याने सरपंचपदावर डोळा आहे, असे सांगितले जाते. त्यादृष्टीने पक्ष व्युहरचना करीत असल्याचे समजते. जिल्हात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून शुक्रवारी ग्रामपंचायतसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवश असल्याने 205 सरप्चपदासाठी 1 हजार 380 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर ग्र्रामपंचायतच्या 2 हजार 145 जागेसाठी 7 हजार 760 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इच्छुकांची संख्या पाहतासर्व पक्षीयांची डोकेदुखी वाढणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय निवडणूक नसली तरी गटतटातच ती लढली जाते असे चित्र असेत, परंतु यंदा गटतटाच्या माध्यमातूनच ग्रामपंचायतीचे सुत्रे हाती घेण्याचा पक्षीय पातळीवर प्रयत्न केला जाणार आहे.  नोव्हेंबर  व  डिसेंबर महिन्यात  मुदत संपणार्‍या या 205 ग्रामपंचायतीच्या  7 ऑक्टोबरला या निवडणुका होत  आहेत. अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये सर्वाधिक अर्ज संगमनेर, पारनेर व नगर तालुक्यातील आहेत. अर्जाची छाननी 25 सप्टेंबरला होणार आहे.