Breaking News

बेपत्ता तरूणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

घरातून बेपत्ता असलेल्या ईस्माईल उस्मान सय्यद या तरूणाचा मृतदेह जामखेड बस स्थानक परिसरात आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ईस्माईल उस्मान सय्यद (वय 38 रा सदाफूले वस्ती) हा तरूण कधी मोलमजुरी तर कधी बस स्थानकात चणे-फूटाणे विकून उदरनिर्वाह करीत होता. तो शनिवार दि. 3 जून पासून घरातून बेपत्ता झाला होता. त्याचे नातेवाईक चौकशी व शोध घेत फिरत असतांना, जामखेड बस स्थानक परिसरातील डॉ. प्रताप चौरे यांच्या दवाखान्याच्या बांधकामावर चप्पल व कपडे आढळून आले, तेंव्हा नातेवाईकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी कपडे व इतर वस्तू तपासून नातेवाईकांकडे दिले. मयत ईस्माईल यांची पत्नी कपडे सापडले त्याठिकाणी, वारंवार अपेक्षेने जाऊन पाहात होती. आज मंगळवार दि. 5 जून रोजी सकाळीच तेथे शोधायला गेली असता, दोन दिवसांपूर्वी जोरदार झालेल्या पावसामुळे बांधकामावरील हौद पाण्याने भरले होते. एका हौदात रक्ताचे पाणी पाहून नातेवाईकांना व पोलिसांना सांगितले. इंजिन लावून हौदातील पाणी काढुन खाली पाहिले असता, इस्माईल यांचा मृतदेह दिसला. मोठा कष्टाने तळघराच्या हौदातून नागरिकांनी मृतदेह बाहेर काढून, शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मयताच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, दोन मुली व आई असा परिवार आहे