Breaking News

जामखेडमधील विद्यार्थ्यांच्या बोगस प्रवेशांची चौकशी सुरू...!

इ. 11 वी, 12 वी प्रवेशासाठी मराठवाड्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जामखेडमधील ज्यूनिअर कॉलेजांमध्ये प्रवेश घेतात, आणि खाजगी शिकवणीसाठी लातूर, पुणे, औरंगाबाद याठिकाणी जातात. यासर्व प्रकरणात जामखेडमधील 
संस्थाचालक प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 20 ते 25 हजार रुपये प्रतीवर्षी अतिरिक्त फी घेतात. यासर्व प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी जामखेड येथील राहुल आहेर यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. याबाबत दैनिक लोकमंथनने ’जामखेडमध्ये शैक्षणिक संस्थाचालक शिक्षणाचा बाजार कशा पद्धतीने करत आहेत. स्थानिक विद्यार्थ्यांना वंचित ठेवून केवळ पैशासाठी परजिल्ह्यातील जामखेडला बोगस अ‍ॅडमिशन संस्थाचालक करताहेत, शिक्षणाचा बाजार करून जामखेडचे नाव शैक्षणिक श्रेत्रात बदनाम करत आहेत. 
याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आज (दि.23) जून रोजी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक सुनील वाळके यांनी जामखेड शहरातील ज्यूनिअर कॉलेजमध्ये जावून बोगस प्रवेशांची चौकशी केली. सकाळी ल.ना. होशिंग ज्यु.कॉलेज, नागेश ज्यू.कॉलेज, महावीर ज्यू.कॉलेज, राजमाता जिजाऊ ज्यू. कॉलेज, ना.भा.तांबे ज्यू. कॉलेज व तक्षशिला ज्यू. कॉलेज या ठिकाणी भेटी देऊन प्रवेश प्रक्रिया तपासून संबंधित तक्रारींची शहानिशा केली. त्यानुसार ल.ना. होशिंग, नागेश विद्यालय व महावीर ज्यूनिअर कॉलेज हे तीनच कॉलेज सुरू असलेले आढळून आले तर, राजमाता जिजाऊ कॉलेज, भा.रा. तांबे कॉलेज, तक्षशिला ज्यू. कॉलेज बंद स्थितीत आढळून आल्याचे शिक्षण उपनिरीक्षक वाळके यांनी सांगितले. दरम्यान तालुक्यातील इतरही ज्युनिअर कॉलेजमध्ये जावून चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परजिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्यास प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेशही सर्व कॉलेज प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यासर्व प्रकरणी कोणते कॉलेज दोषी आढळते व काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान विज्ञान शाखेकरिता बायोमॅट्रीक हजेरी लागू झाल्याने शिक्षणाचा बाजारीकरण करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.