Breaking News

वाळूप्रश्नावरुन हनुमंतगावात तणावपूर्ण वातावरण! तरुणांनी वाहतुकीला केला अडथळा


सात्रळ / प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील हनुमंतगाव येथे सुरु असलेल्या सरकारी वाळू उपसा लिलावाच्या प्रक्रियेदरम्यान यंत्रसामुग्रीचा होणारा वापर आणि वाहनधारकांना तसेच स्थानिक नागरिकांना होणारी दमबाजी, रात्रीच्या वेळी वाळू उपसा सुरु ठेवल्याने स्थानिक नागरिक व ठेकेदार यांच्यात बाचाबाची होऊन वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी शेकडो तरुण वाळू उपशाच्या रस्त्यावर जमा होऊन त्यांनी वाहतूक बंद पाडली. 

वाळूचे लिलाव सर्वांना सहभागी करून घेतले नाही. काही राजकारणी व्यक्तींनी वाळू लिलावास परस्पर पाठिंबा दर्शविला, असे आरोप तरुणांनी केले. हाताशी धरून वाळू उपसा प्रमाणापेक्षा जास्त होऊनही वजनदार नागरिक मूग गिळून गप्प राहिल्याने यामागे काहीतरी काळेबेरे असावे, असा सामान्य नागरिकांचा समज झाला आहे. रात्रभर धावणारी वाहने, वाजवीपेक्षा जास्त वाळू भरल्यामुळे तर रस्ते तर फुटलेच. पण आजूबाजूच्या रस्त्यालगतच्या घरांना तडे जाऊ लागले आहेत. 

दरम्यान, तहसीलदार येणार, असे समजताच संबधितांनी जेसीबी, पोकलेन मशीन पळवून नेली. तरुणांनी पाठलाग करून सदर मशिनरी ताब्यात घेतली. काही यंत्रे काटेरी झुडपात लपविण्यात आली. वाळू उपसा नियमाने होत असेल तर ही यंत्रे पळविण्याचे कारण काय, असा सवाल युवकांनी उपस्थित केला.