अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन
सिंधुदुर्गनगरी, दि. 11, जून - सर्व रजिस्टरे बंद होऊन मोबाईलवरच सर्व नोंदी होतील. एकच रजिस्टर राहील. त्यामुळे 10 वर्षांचे रेकॉर्ड ठेवण्याचा मुद्दाही निकालात निघेल. यासाठी राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना लवकरच आठ हजार रुपयांचा ण्ड्रॉईड मोबाईल देण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त इंद्रा मालो यांनी राज्य अंगणवाडी कृती समितीला दिली. राज्यातील अंगणवाडी सेविक ांच्या प्रश्नांसंदर्भात समितीची सभा आयुक्त मालो यांच्या दालनात मुंबई येथे अंगणवाडीच्या नेत्या कमलताई परुळेकर आणि राज्यातील संघटनेच्या इतर नेत्यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेत एप्रिल महिन्याचे मानधन पुढील पंधरा दिवसांत काढण्यात येईल, अशीही ग्वाही आयुक्तांनी दिल्याची माहिती परुळेकर यांनी दिली.
दरम्यान यावेळी मांडलेल्या प्रश्नांबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दाखवल्याने 25 जूनपासून आयुक्त कार्यालयासमोर करण्यात येणारे बेमुदत उपोषण ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आले आहे, असेही परुळेकर म्हणाल्या.
अंगणवाडी कृती समितीच्या सभेत बोलताना आयुक्त मालो म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांचे एप्रिलचे मानधन 15 दिवसांत मिळेल. त्यानंतर मेचे मानधन त्यापुढील 15 दिवसांत मिळेल. सेविकांनी र जिस्टरे छापून घेऊ नयेत. तीन व चारचे रजिस्टर सरकार छापून देणार. लवकरच अंगणवाडी सेविकांना आठ हजार रुपयांचा ण्ड्रॉईड मोबाईल देण्यात येईल. सर्व रजिस्टरे बंद होऊन मोबाईलवरच सर्व नोंदी होतील. एकच रजिस्टर राहील. त्यामुळे दहा वर्षांचे रेकॉर्ड ठेवण्याचा मुद्दाही निकालात निघेल. सेवासमाप्ती लाभाचे पैसे अनेक ठिकाणी फारच विलंबाने मिळतात. ते निवृत्तीनंतर दहा दिवसांत मिळतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहेच. शिवाय प्रलंबित रकमा लवकर मिळाव्यात, यासाठी एलआयसीशी 14 ते 18 जूनच्या दरम्यान चर्चा करण्यात येईल. आहारासंबंधी केंद्राक डून रक्कम वाढवून मिळालीच आहे. ती लवकरच देणार आहोत. लवकरच वाढीव भाडे दिले जाईल. रिक्त जागा तातडीने भरणे व पदोन्नतीवरील स्थगिती उठविण्यासाठी राज्यपालांशी चर्चा करण्यात येईल. सेवानिवृत्तीची 1 लाख व 75 हजाराची मर्यादा काढून एका वर्षाच्या सेवेसाठी एक महिन्याचा पगार असा फॉर्म्युला ठेवावा, ही आपली मागणी त्यांना पटली. पण त्यासाठी शासनाला मागणी पटवून देण्याचा आपण प्रयत्न करू, असे त्या म्हणाल्या.