Breaking News

लाटेच्या तडाख्यातून पर्यटक बचावले


सिंधुदुर्गनगरी, दि. 11, जून - मालवण मध्ये रॉक गार्डन परिसरात मुसळधार पाउस पडत असताना आणि समुद्र खवळलेला असताना सेल्फी घेत मौज मजा करण काही पर्यटकांच्या जीवावर बेतणार होत. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून हे पर्यटक लाटेच्या तडाख्यात सापडूनसुद्धा बचावले आणि गुपचूप माघारी फिरले.
मालवणात सध्या दमदार पाऊस पडत आहे. समुद्रही खवळला आहे. जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. मालवण रॉक गार्डन परिसरात या लाटा अधिकच उसळत आहेत. अनेक पर्यटक व नागरिक या लाटांचा आनंद लुटतात. त्यात काही अतिउत्साही पर्यटकही असतात. याच स्वरूपातील काही अति उत्साही पर्यटक शनिवारी सायंकाळी मालवणात दाखल झाले. रॉक गार्डन पार्कींग ठिकाणी कार पार्क करून हे युवक पोलीस वसाहत मागील खडकाळ परिसरात उसळणार्‍या लाटांचा आनंद लुटत होते. तर दगडांवर बसून सेल्फीही घेत होते.

हे दृश्य रॉक गार्डन व्यवस्थापक उमेश हर्डीकर यांनी पाहिले. त्या पर्यटकांना ओरडून सूचना केल्या. तर काहींनी पर्यटकांचा हा अतिउत्साही पणा मोबाईल कॅमेरात कैद केला. याचवेळी उसळलेली मोठी लाट पर्यटकांच्या अंगावर धडकली. यात हे पर्यटक दगडात फेकले गेले. त्याच वेळी शूटिंग करणारे पण त्या पर्यटकांना वाचवण्यासाठी धावले. मात्र सुदैवाने पर्यटक बचावले. काही प्रमाणात कि रकोळ जखमी झाले. व लागलीच तेथून काढता पाय घेतला. पर्यटक नेमके कुठले होते हे समजू शकले नाही.