Breaking News

कोतुळच्या नविन पुलासाठी बोअर टेस्टिंगचे काम प्रगती पथावर...

पिंपळगाव खांड धरणात संगमनेर कोतुळ राज्य मार्ग क्र. 65 वरिल कोतुळ गावचा पूल पुर्णपणे बुडाल्यामुळे नविन पुलासाठी पायाच्या कामासाठी बोअर टेस्टिंगचे काम अत्यंत गरजेचे होते. पूल कृती समितिने पाठपुरावा केल्यानंतर संगमनेर येथिल पाटबंधारे विभागाचे अधिकारी गोवर्धने यांनी तात्काळ सूत्र फिरविले. येत्या आठवड्यात बोअर टेस्टिंगचे काम पूर्ण करून, नविन पूलाचे टेंडर काढले जाईल. जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाच्या सर्व अधिकार्‍यांचे कोतुळ ग्रामस्थांनी आभार मानले. या पुलासाठी गेल्या दोन वर्षापासुन अनेक वेळा आंदोलने आणि मोर्चे झाले. मंत्रालयात बैठका झाल्या. सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेले कोतुळ गाव बारा प्रमुख गावांची मुख्य बाजारपेठ आहे. पिंपळगावखांड धरणामुळे पाणी मिळाले मात्र, बाजारपेठ पूल पाण्यात गेल्याने उध्वस्त झाली अशी लोकभावना निर्माण झाली होती. मात्र कोतुळचा बुडालेला पूल हा प्रकल्पाचाच एक भाग असल्याने, पूल पुर्ण झाल्यानंतरच पिंपळगाव खांड धरण प्रकल्प पूर्ण होईल हे सत्य जेंव्हा ग्रामस्थांना समजले तेंव्हा शांततेचे आणि वाट पाहण्याचे धोरण सर्वांनी अंगिकारले. अकोले तालुक्याचे आ. वैभव पिचड यांनी कोतुळच्या नविन पुलासाठी मंत्रालयात संबंधित मंत्र्यांच्या भेटी घेवून विशेष प्रयत्न केले होते.
तर भाजपचे कार्यकर्ते, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमातुन पुला साठी प्रयत्नशिल होते. सर्वच राजकिय पक्षांनी पुलासाठी प्रयत्न केले. कारण पुलाचा प्रश्‍न सामाजिक आणि अतिशय गरजेचा होता. याच राज्यमार्गावरून तोलारखिंड फुटल्यास मुंबई अकोले अंतर फक्त अंदाजे 100 कि.मी इतके राहते. म्हणून हा पुल भविष्यातिल संगमनेर कोतुळ तोलारखिंडमार्गे थेट मुंबई असा असणार आहे. माजी मंत्री बि.जे. खताळ यांनीदेखील अनेक वेळा तोलारखिंड फोडली पाहिजे अशी भुमिका व्यक्त केली. दिल्लीला या राज्यमार्गाची आणि प्रस्तावित तोलारखिंड मुंबई राज्यमार्गाची नकाशानुसार प्रस्तावित रचना आहे असे बोलले जाते. जर असे झाले तर नगरजिल्हा मुंबईजवळ येईल आणि केवळ अकोले आणि संगमनेर या दोन तालुक्यांचाच विकास होणार नाही तर, संपुर्ण जिल्ह्याचा विकास होईल. शिर्डीला जाणे-येणे साठी मुंबईच्या साईभक्तांना सहजसोपे होईल. म्हणुन कोतुळच्या पुलाचे महत्व भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कुठल्याही गावाचा आणि शहरांचा विकास हा तेथील दळणवळणाच्या साधणांवरून होत असतो. कोतुळ गावचा विकास या पुलामुळे निश्‍चित होणार आहे. कारण हा पुल कोतुळ गावाला दोन तालुक्यांना जोडतो. या दोन तालुक्यांच्या जनसंपर्कावर कोतुळचे भविष्य आणि प्रगती उज्वल आहे. कोतुळच्या पुलासाठी अरविंद देशमुख, रवि आरोटे, चंद्रकांत घाटकर, बबलु देशमुख, सचिन गिते, श्याम देशमुख, रवि वाकचौरे, बापु देशमुख, फारूख पठाण या पुल कृती सदस्यांबरोबरच जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सिताराम देशमुख, जि. प. सदस्य रमेश देशमुख, सभापती भरत देशमाने, राजेद्र देशमुख, सोमदास पवार, सुरेश देशमुख, रमेश देशमुख, सरपंच गुलाब खरात या सर्व राजकिय पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितरित्या प्रयत्न आणि आंदोलन केले.