Breaking News

'पशुसंवर्धन' मधून सेवानिवृत्त डॉ.शिंदेच्या निरोपावेळी गावकरी गहिवरले


माही जळगाव येथे (ता.कर्जत) सहा.पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ.बी.एम.शिंदे पशुसंवर्धन खात्यामधून ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त माही जळगाव ग्रामस्थांनी नुकताच त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.

डॉ.बी.एम.शिंदे याचं मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र दगडवाडी ( पो.करंजी) आहे.जुलै १९८८ रोजी ते पशुधन पर्यवेक्षक म्हणून नगर तालुक्यातील खारे-कर्जुने येथे रुजू झाले.तर एप्रिल १९९० ते जुलै २०१२ अशी तब्बल २२ वर्षे त्यांनी पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे या गावी सेवा केली.पाथर्डी च्या पूर्व भागातील चिंचपूर इजदे या दवाखान्या अंतर्गत विठ्ठलवाडी,करोडी,मोहटा,पिंपळगाव टप्पा,चिंचपूर पांगूळ,वडगाव,जोगेवाडी, ढाकणवाडी,मानेवाडी आदीं गावाचां कार्यभार त्यांच्याकडे होता.

तर तत्पर, विनम्र व प्रामाणिक सेवेमुळे कार्यक्षेत्रा बाहेरील पाथर्डी तालुक्यासह मराठवाड्याच्या हद्दीतील शिरूर,आष्टी तालुक्यातील सुमारे १५ गावांमधील डोंगरदऱ्यात वास्तव्यास असणाऱ्या शेतकरी पशुपालकांना ही डॉ.बी.शिंदे यांचाच आधार वाटे.त्यामुळेच चिंचपूर इजदे येथून झालेल्या बदली नंतर सुध्दा अनेक वर्षं त्या परिसरातील शेतकरी फोन वरून डॉ.शिंदे यांचाच सल्ला घेत.

जुलै २०१२ ला पुन्हा खारे-कर्जुने (ता.नगर) येथे बदली झाली.या परिसरात खारे-कर्जुने सह निमगाव घाणा, इसळक,निंबळक या दुग्धोत्पादना मध्ये अग्रेसर असणाऱ्या गावांमध्ये ५ वर्षे सेवा केली.या कालावधी मध्ये परिसरात दुभत्या जनावरांसाठी ठोंबे,मका वाटप उपक्रम,हायड्रोपोनिक्स,अझोला,मुरघास सारखं चाऱ्याचं अत्याधुनिक तंत्रज्ञान व निकृष्ट चाऱ्यापासून सकस आहार बनविण्याचे प्रयोग व प्रात्यक्षिक,शेळी गटवाटप,गाय गटवाटप, आदिवासीं साठी तलंगा (कोंबड्या) वाटप,कडबाकुट्टी अशा वैयक्तिक लाभाच्या योजना,पशुपालक मेळावा,शिबिर, चर्चासत्र व त्या अंतर्गत रोगनिदान,वंध्यत्व मार्गदर्शन, उपचार,औषधी व माहितीपत्रक वाटप,कामधेनू अभ्यास सहल असे विविध कार्यक्रम, उपक्रम राबवून पशुपालक शेतकरी बांधवांना लाभ मिळवून दिला. परीसरातील शेतकरी आजही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

मागच्याच वर्षी ऑगस्ट २०१७ मध्ये कर्जत मधील माहिजळगाव येथे सहा.पशुधन विकास अधिकारी या पदासाठी बढतीवर बदली झाली.या ८ महिन्यांच्या कालावधीमध्ये ही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.याप्रसंगी अनेक ग्रामस्थ व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ.बी.शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला.