Breaking News

तांदुळ व्यापार्‍याची फसवणूक ः तिघांवर गुन्हा

सांगली, दि. 26 - शहरातील गणपती पेठेतील एका तांदूळ व्यापार्‍याला घरी कार्यक्रम असल्याचे सांगून त्याच्याकडून 70 हजारांचा तांदूळ घेऊन त्या बदल्यात  त्याला बनावट धनादेश दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 ते 15 डिसेंबर दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी सांगली शहर पोलिस  ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
संजय गुलाब गिडवाणी व अन्य दोघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत. याबाबत तांदूळ व्यापारी जयंतीलाल दगडूलाल बोत्रा यांनी फिर्याद दिली आहे.  बोत्रा यांचे गणपती पेठेत होलसेल तांदूळ विक्रीचे दुकान आहे. 13 रोजी गिडवाणी यांनी बोत्रा यांना फोन केला. त्यावेळी त्याने ऋषिकेश पाटील बोलतोय असे  सांगितले. त्यावेळी घरी कार्यक्रम असल्याने तांदूळ लागणार आहे. त्यासाठी मी दोघांना तुमच्याकडे चेकबूक घेऊन पाठवितो. त्यांच्याकडून चेक घेऊन तांदूळ द्या  असे सांगितले.
त्यानंतर 15 रोजीही असेच सांगून त्यांच्याकडून तांदूळ नेला. असा एकूण 70 हजार 253 रुपयांचा तांदूळ नेला. त्यामध्ये 10 किलोची 140 ठक्की व 20 किलोचे  दहा बॉक्स यांचा समावेश आहे. त्याबदल्यात त्यांना उपळावी (ता. तासगांव) येथील प्रकाश माळी यांच्या नावाचे मिळविलेले धनादेश त्यांनी दिले होते. बोत्रा यांनी  धनादेश बँकेत भरल्यानंतर ते वटले नाहीत. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर तो फोन गिडवाणी याने केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार  बोत्रा यांनी फिर्याद दिल्यानंतर गिडवाणी आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.