Breaking News

प्रेस क्लब व पोलिस दलाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

मनुष्याला जगण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही. ऑक्सीजन देण्याचे काम झाडे करीत असतात, त्यांच्याकडून मिळणार्‍या श्‍वासासाठी वृक्षांना जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वृक्षरोपणाने पर्यावरणाचा समतोल साधला जाणार असल्याने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्रत्येकाने एक झाड लावण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले.


जागतिक पर्यावरण दिना निमित्त प्रेस क्लब व पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने पोलिस मुख्यालयाच्या आवारात राबविण्यात आलेल्या वृक्षरोपण अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा पोलिस अधिक्षक शर्मा बोलत होते. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, अप्पर पोलिस अधिक्षक घनश्याम पाटील, पोलिस उप अधिक्षक (गृह) अरुण जगताप, मुख्यालयाचे पो.नि. दशरथ हटकर, पो.नि. अमितकुमार लिगडे आदिंसह पोलिस अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
मनुष्याचे असतित्व टिकविण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाचा संदेश देत पोलिस व पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत वृक्षरोपण मोहिम राबविली. नेहमीच तणावपुर्ण वातावरणात वावरणार्‍या पोलिसांच्या जीवनात सुंगध दरवळण्यासाठी मोगर्‍यासह इतर फळ झाडांचे रोपण पोलिस मुख्यालय व पोलिस वसाहतीच्या परिसरात करण्यात आले. जिल्हा पोलिस अधिक्षक शर्मा यांच्या हस्ते वृक्षरोपणाने या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सदर झाडे लावण्यात आली. बातमीच्या माध्यमातून समाजाला शहाणे करण्याबरोबरच आपल्या कृतीद्वारे विविध उपक्रमातून सामाजिक उत्तर दायित्वाची भुमिका प्रेस क्लब पार पाडत आहे. सण, उत्सवातून सामाजिक सलोख्याचा संदेश देत तर जलसंधारण व वृक्षरोपणाच्या माध्यमातून पर्यावरण समतोल साधण्यासाठी प्रेस क्लबच्या वतीने पुढाकार घेण्यात येत असल्याची भावना मन्सूर शेख यांनी व्यक्त केली.
दोन वर्षापुर्वी प्रेस क्लब व पोलिस दलाच्या वतीने पोलिस मुख्यालयाच्या मैदानात लावण्यात आलेली झाडे चांगली बहरली असता जिल्हा पोलिस अधिक्षक शर्मा यांनी त्याची पहाणी केली. तर झाडांचे संगोपण करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे यांनी केले. आभार सुशील थोरात यांनी मानले