Breaking News

‘मुन्नाभाईं’च्या कारवाईसाठी कोणाच्या मरणाची वाट पाहता? संतप्त नागरिकांचा सवाल


अकोले प्रतिनिधी 
तालुक्यातील आढळा परिसरात बोगस डॉक्टरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. आरोग्य विभागाने या डॉक्टरांकड़े कानाडोळा करत या ‘मुन्नाभाईं’ना एकप्रकारे अभय दिले आहे. त्यामुळे या डॉक्टरांमध्ये आणि आरोग्य विभागात काहीतरी शिजत असल्याचा ‘वास’ येत आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असलेल्या या बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हाप्रशासन कोणाच्या मरणाची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला आहे.

अकोले तालुक्यातील समशेरपूर, सावरगाव पाट, केळी-रुम्हणवाडी, कोंभाळणे, खिरविरे, एकदरे, तिरदे, पाचपट्टा या प्रमुख गावांमध्ये बोगस डॉक्टरांची संख्या जास्त आहे. या डॉक्टरांनी गावांत आपापले क्लिनिक सुरु केले आहे. अल्पदरात नागरिकांना ही डॉक्टर मंडळी नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देत आहेत. या भागातील जनता निरक्षर आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. मात्र गंभीर आजाराची लोकांना भीती दाखवून या लोकांचे आर्थिक शोषण करीत आहेत. हे ‘मुन्नाभाई’ घरोघर जाऊन लोकांशी गोड गोड बोलतात आणि लोकांवर भुरळ टाकतात. मात्र या डॉक्टरांकडे कोणतीही अधिकृत पदवी नाही. मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र नाही. परंतु या डॉक्टरांकडे चार चाकी वाहन आहे. या डॉक्टरांकडे उपचारासाठी येत असलेल्या रुग्णाला ज्या डॉक्टरांकडे ‘रेफर’ केले जाते, त्या डॉक्टरांकडून हे ‘मुन्नाभाई’ कमिशसन घेत आहे. त्यामुळे लोकांना आरोग्यसेवेच्या नावाखाली मृत्यूच्या दारात ढकलत असलेल्या या ‘मुन्नाभाईं’च्या गळ्याला कारवाईचे फास आवळण्याची वेळ आली असून याकडे दुर्लक्ष करीत असलेल्या आरोग्य विभागाचे कान जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एकदा उपटावेच, अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.  

आरोग्य विभाग फौजदारी कारवाई करणार 

अकोले तालुक्यातील आढळा खोऱ्यात बोगस डॉक्टर आम्हालादेखील आढळून आले आहेत. संबंधित डॉक्टरांनी बॉम्बे नर्सिंग ऍक्ट, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ज्या डॉक्टरांनी ही परवानगी घेऊन रजिस्ट्रेशन केले नसेल त्या डॉक्टरांची यादी जिल्हाधिकारी यांना पाठवून कडक कारवाई करणार आहोत. संबंधित डॉक्टरांवर आरोग्य विभागाच्यावतीने फौजदारी कारवाईदेखील करण्यात येणार आहे.

डॉ. इंद्रजित गंभीरे, तालूका आरोग्य अधिकारी, अकोले