Breaking News

वीज अंगावर पडून शेतकर्‍याचा मृत्यू

कर्जत तालुक्यातील धालवडी येथील शेतकर्‍याच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी 5 वा.च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

धालवडी येथील अरुण भिमराव चव्हाण (वय 45) हे गुरुवारी सायंकाळी मेंढ्या चारुन पिंपळवाडी रस्त्याने घरी येत होते. घरी परतत असताना विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वस्तीजवळ येताच त्यांच्या अंगावर वीज पडली. विजेच्या धक्क्याने ते जागेवर कोसळले. काही वेळातच 108 क्रमांकाची गाडी घटनास्थळी बोलाविण्यात आली. मात्र गाडी येण्यापूर्वीच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. अनेक वर्षांपासुन ते मेंढीपालन व्यवसाय करीत होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यातच कुटूंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले.सायंकाळी 7 वा. मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत येथे हलविण्यात आले. पोलीस पाटील हेमलता पंडित यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत, घटनेची माहिती कर्जत पोलिसांना दिली. चव्हाण कुटुंबास कृषी विभागाचा दोन लाख रुपयांचा अपघात विम्याचे सहाय्य मिळावे अशी मागणी सेवा संस्थेचे चेअरमन मोहन सुपेकर यांनी केली आहे.