Breaking News

प्रत्येक कृत्याचा हिशोब अल्लाह घेईल


रमजान महिन्यात अल्लाहने प्रत्येक नेकीचे (पुण्याचे)मूल्य सत्तरपट वाढवून दिले आहे. एक नेक काम केल्यास सत्तर कामाचे पुण्य या महिन्यात प्राप्त होते. प्रश्‍न असा आहे की, हे पुण्य वाढवून देण्याचे कारण काय? तर याचे उत्तर हजर पैगंबर (स.) यांनी दिले आहे. ते असे की, उम्मते मोहम्मदी (स.)च्या पूर्वीच्या लोकांचे वयोमान खूप होते. हजरत आदम अलैसलाम यांचे वय एक हजार वर्ष तर नूह अलैसलाम यांचे वय नऊशे वर्षांचे होते. आजच्या माणसाचे सरासरी वय 70 वर्षे आहे. एवढ्या कमी वयाचा माणूस पूर्वीच्या माणसांच्या पुण्य कार्याची बरोबरी कशी करू शकेल? मागासवर्गीयांना समाजात स्थान देण्यासाठी सरकार त्यांना विशेष सवलती देत असते. कमकुवत घटकांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी शासन विशेष सवलती देत असतो. त्याचप्रमाणे अल्लाहने या उम्मतसाठी ही खास सवलत निर्माण केली आहे. इतर दिवसात एका दिवसात पाच वेळा नमाज केल्यास फक्त 5 पुण्य प्राप्त होतात. रमजान म हिन्यात एका दिवसात पाच वेळा नमाज पठण केल्यास साडेतीनशे पुण्य प्राप्त होते. या महिन्याच्या शेवटच्या चरणात एका रात्रीत प्रार्थना केल्यास एक हजार महिन्याच्या प्रार्थनेचे (म्हणजे 83 वर्ष 4 महिने) पुण्य प्राप्त होते. प्रेषित हजर पैगंबर (स.) यांच्या उम्मतीसाठी ही विशेष योजना अल्लाहने लागू केली आहे.
सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करताना विश्‍वस्तांच्या भावनेने कार्य करण्याची गरज असते. एखादे पद आपणास मिळाल्यास आपली जबाबदारी अधिक वाढते. हजरत उमरबीन अब्दुल अजीज इस्लामी राजवटीत गवर्नर होते. सरकारी खजिन्यातील कोणतीही वस्तू स्वतःसाठी कधी वापरत नसत. त्यांचा स्वतःचा वेगळा दिवा होता. शासकीय काम क रताना सरकारी दिवा व खासगी काम करताना स्वतःचा दिवा वापरीत. स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी सरकारी खजिन्यातील एक पैसाही कधी खर्च केला नाही, अशी उदाहरणे आज तर पहावयासही मिळत नाही. आज सत्तेच्या पदांचा सर्रास गैरवापर केला जातो. संस्था ताब्यात असतील तर तेथून नको तो खर्च केला जातो. मशिदी, मदरसे यावर काम करणार्‍यांनीच पारदर्शकपणे कार्य करणे गरजेचे आहे. निनावी पत्रे पाठवून विनाकारण गैरसमज निर्माण करण्यापेक्षा संबंधितांना समक्ष जाब विचारण्यात गैर काहीच नाही. तसेच इतरांनी विचारण्यापेक्षा आपणच एखाद्या कार्यासाठी झालेला जमाखर्च जाहीर करून टाकल्यास वेगळी चर्चा होत नाही. आपण केलेला कारभार स्वच्छ असेल तर हिशोब जाहीर करण्यात अडचण काय? शेवटी आपण केलेल्या प्रत्येक कार्याची नोंद अल्लाहकडे असून, आपल्याला प्रत्येक कृत्याचा हिशोब अल्लाहला द्यावाच लागेल, याची नोंद प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता आहे.


प्रासंगिक 
आबीद दुलेखान 
मो. 9860477869