Breaking News

शेतकरी आता पाठविणार मुख्यमंत्र्यांना दुध,तुर,साखर

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी संप पुकारण्यात आला असून आजपासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना दूध, तुर, साखर घरी पाठवण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.अजित नवले यांनी दिली आहे. दरम्यान, शेतकर्‍यांच्या बंदमुळे शहरी भागात त्याचा परिणाम दिसू लागला असून बहुतांश ठिकाणी भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे.


शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी 1 ते 10 जून संप पुकारण्यात आला आहे. या अगोदर शेतकर्‍यांनी दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला होता. तसेच भाजीपाला गावामध्ये आणायचा नाही असा निर्धारही व्यक्त केला होता. नगर जिल्हयात बहुतांशी शेतकरी संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या. वास्तविक पाहता अनेक संघटनांमध्ये उभी फुटसुध्दा पडली होती. त्याचाही तोटा अनेक संघटनांना बसु लागला आहे. त्यामुळे आता बहुतांशी संघटनांनी आंदोलनात सहभागी व्हायचे असा निर्णय घेतला आहे.
नगर जिल्हयात पुकारलेल्या बंदमुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे त्याचे दरही आता वाढले आहे. पाल्याभाज्या 15 ते 20 रुपयांच्या खाली मिळत नाहीत. तर दुधाचे दरसुध्दा काही प्रमाणामध्ये वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज भाजीपाल्याची आवक घटली तर दुसरीकडे कांदा बटाट्याची आवकही घटली आहे. याचा परिणाम आता जाणवू लागला आहे.
अनेक बाजारपेठेत आवक घटली आहे. दि.6 व 7 रोजी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 5 जून रोजी राज्यभर तहसिल कार्यालयात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांना दुध ,तुर,साखर भेट पाठविण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी प्रत्येक ठिकाणी शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.अजित नवले यांनी केले आहे.संपाच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्येसुध्दा त्याची झळ बसण्यास सुरवात झाली आहे. दुधाचे टँकर जर उपलब्ध होवू शकले नाही तर अनेक शेतकर्‍यांनी दुध न घालण्याचा निर्णय सुध्दा घेतला आहे. दोन दिवसानंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली असून अनेकांचे धाबे दणानले आहेत.