Breaking News

देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू : प्रकाश आंबेडकर

पुणे : सध्या देशात आरक्षणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दंगली घडवून देशात अस्थिर वातावरण निर्माण करायचे, जेणेकरून आणीबाणी आणता येईल, असा आरोप भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पुण्यात भटक्या विमुक्त जातींचा सत्ता निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

या सरकारला देशात दंगली घडवायच्या आहेत. हा त्यांचा अजेंडा आहे. जर दंगली झाल्या तर आणीबाणी लादता येईल आणि शांतता होत नाही तोपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, हे सांगायला सरकार मोकळे, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. तसेच काहीही केले तरी सरकारला घटना बदलता येणार नाही, असेही ते पुढे म्हणाले. आरएसएसच्या व्यासपीठावर जाणार्‍या प्रणव मुखर्जींनी काँग्रेसची इमानदारी राखली नाही, असे म्हणत मुखर्जी यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली. या कार्यक्रमाला भारिपचे नेते प्रकाश आंबेडक र उद्घाटक म्हणून आले होते, तर मार्गदर्शक म्हणून छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण माने होते. 42 जातीतील भटक्या विमुक्तांच्या मागण्यांसाठी आता कुणाकडे हात पसरायचे नाही, तर सत्तेत सहभागी व्हायचे, असा निर्धार करत येणार्‍या निवडणुका प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.