Breaking News

जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त फिनिक्स फौंडेशनच्या मोफत नेत्रतपासणी शिबीर 26 वर्षात 1 लाख 63 हजार जणांना मिळाली दृष्टी

गरीब रुग्णांना नेत्र उपचाराचा लाभ मिळावा, यासाठी सुरु केलेल्या मोफत नेत्रशस्त्रक्रिया शिबीरांतून 26 वर्षात सुमारे 1 लाख 63 हजार 334 जणांची मोफत नेत्रशस्त्रक्रिया केली आहे. त्यात सुमारे 75 हजार लाभार्थी हे आर्थिक दुर्बल, आदिवासी, भटक्या समाजातील नागरिकांचा समावेश आहे. फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या प्रयत्नातून दरमहा हे शिबीर घेतले जात आहे. नेत्रदानासाठीही जनजागृती केली जात आहे.

नगरमधील जलसंपदा विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले जालिंदर बोरुडे नोकरी सांभाळून सामाजिक कार्य करीत आहेत. 1991 ला त्यांनी फिनिक्स फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली. नागरदेवळे येथे पुण्यातील के.के.आय. बुधराणी रुग्णालयाच्या सहकार्याने दर महिन्याला मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबीर ते घेतात. शिबीरासाठी बोरुडे स्वत: खर्च करतात. आतापर्यंत या शिबीरातून सुमारे 1 लाख 63 हजार 334 जणांची मोफत नेत्रशस्त्रक्रिया झालेली आहे. आतापर्यंत 26 वर्षात सुमारे 63 हजार वंचित, दुर्बल घटक, आदिवासी, अनाथ यांची मोफत नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बीड. औरंगाबाद, सोलापुर, आदी दुष्काळी भागातील शेतकर्‍यांची संख्या अधिक आहे. रक्तदान, अस्थिरोग, महिलांच्या विविध आजारांची तपासणी आयुर्वेद, पंचकर्म, हृदयरोग, दंततपासणी, हिमोग्लोबिन आदी तपासण्यांसाठीही शिबीरे घेतली जात आहेत.
स्वत: खर्च करुन शिबीर घेत असलो तरी, गोर-गरीबांना त्यामुळे फायदा होत असल्याचे समाधान मिळते. त्यामुळे हा उपक्रम कायम सुरु ठेवणार आहे, असे बोरुडे यांनी सांगितले.