Breaking News

स्व. थोरातांचे दंडकारण्य अभियान हे देवकार्य : हभप ढोक


संगमनेर प्रतिनिधी
वृक्ष हे सर्वांना महत्वाचा असा प्राणवायू अर्थात ऑक्सिजन विनामूल्य देतात. त्यांचे महत्व ओळखून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरु केलेले वृक्षरोपणाचे हे दंडकारण्य अभियान देवकार्य आहे. प्रत्येक भाविकाने हे रोप घरी किंवा शेतात रोपण करुन त्यांचे संवर्धन करावे, असे प्रतिपादन रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज यांनी केले. 

पिंपळगांव देपा येथे प. पू. गगनगिरी महाराज सप्ताहात रामायाणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते दंडकारण्य अभियानातील १० हजार रोपांचे भाविकांना मोफत वाटप करण्यात आले. थोर स्वातंत्रसेनानी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून हे दंडकारण्य अभियान सुरु झाले आहे. थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, सभापती शंकर खेमनर, दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात, अजय फटांगरे, कपिल पवार, विष्णुपंत रहाटळ, कोळवाडे शाळेचे मुख्याध्यापक दशरथ वर्पे, अ‍ॅड. सुहास आहेर, नामदेव कहांडळ आदींसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हभप ढोक महाराज म्हणाले, महाराष्ट्राला मोठी अध्यात्मिक व वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या रोपांचे ‘वृक्षप्रसाद’ म्हणून भाविकांना वितरण करण्यात आले. सध्या वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस हे ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्पपरिणाम आहेत. 

दरम्यान, कहांडळ यांनी यांनी सांगितले, सजीवसृष्टीसाठी ऑक्सिजन, पाणी, हिरवाई मिळावी, यासाठी सहकारमहर्षि स्व. भाऊसाहेब थोरात यांनी २००६ साली हे दंडकारण्य अभियान सुरु केले. आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासाठी ते दिशादर्शक ठरले आहे. या अभियानातून मागील १२ वर्षांत उघड्या बोडक्या डोंगरावर सुमारे २९ कोटी बियांचे व २४ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. सर्वत्र वृक्षसंवर्धन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संगमनेर तालुक्यात वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली आहे. या अभियानाअंतर्गत आज पिंपळगांव देपा येथे वड, पिंपळ, सिताफळ, लिंबू, आवळा अशा विविध प्रकारच्या १० हजार वृक्षांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी इंद्रजित थोरात यांनी दंडकारण्य अभियानाविषयी विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विशाल काळे, अजित सरोदे, जालिंदर नवले, केशव मोकळ, रमेश राहिंज आदी उपस्थित होते. यावेळी नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचलन केले. मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी आभार मानले.