जम्मू काश्मीरमध्ये लष्करी कारवाईचा मेहबुबा मुक्तींचा विरोध
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पाठिंबा काढल्यामुळे मेहबुबा मुफ्ती सरकार कोसळले. मुफ्ती यांचा राज्यात कारवाई करण्यासाठी लष्कराचा वापर करण्यास विरोध होता. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील बेबनाव निर्णयाला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. ’रायजिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येनंतर हा विसंवाद टोकाला गेला. बुखारी यांच्यावर हल्ला होणार असल्याची लष्कराला पूर्वसूचना होती. त्यासाठी श्रीनगरमध्ये जाऊन थेट कारवाई करण्याचा लष्कराचा पवित्रा होता. मात्र, मुफ्ती यांचा लष्काराच्या निर्णयाला विरोध होता, अशी माहिती अंतर्गत सुत्रांनी दिली. बुखारी यांच्या हत्येनंतर मुफ्ती सरकारने कारवाई करण्याच्या दृष्टीने लष्कराला नियमावली ठरवून दिली. घातक शस्त्रांचा वापर न करण्याचा सूचना लष्कराला दिल्याचे सांगितले जाते. तसेच गुप्त माहिती राज्य सरकारकडून लष्कराला दिली जात नव्हती. वाढत्या शस्त्रसंधीच्या घटनांमुळे सरकारवर टीकेची झोड उठविली गेली. त्यावेळी विरोधी गटाशी चर्चा करावी अशी मुफ्ती यांची भूमिका होती. मात्र, लष्कराला चर्चेला विरोध होता, असेही सुत्रांनी म्हटले आहे.