युट्यूब चॅनेलविरुद्ध गुन्हे दाखल; विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिली तक्रार
एका युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून धादांत खोटे व्हिडीओ अपलोड करून काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान तसेच प्रमुख नेत्यांबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार होत आहे. या प्रकारच्या विरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी लोणी पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तींवर तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विखे यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की चॅनेलवर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडिओत काँग्रेस पक्ष आणि पक्षातील प्रमुख नेत्यांबाबत निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारित करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसच्या ने त्यांची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरुन गांधी-नेहरू परिवाराचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न या चॅनेलने केला आहे. यावेळी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, भगवंतराव विखे, किसनराव विखे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अनिल विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, संजय आहेर, चेअरमन नंदू राठी, माजी उपसभापती सुभाष विखे, उपसरपंच अनिल विखे, लक्ष्मण विखे, गणेश विखे, बंडू लगड आदींसह शिर्डी नगर पंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते.