गर्भलिंग निदान करणार्या 62 डॉक्टरांवर कारवाई
मुंबई, प्रतिनिधी, दि. 27 - पीसीपीएनडीटी (गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान) कायद्याचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान चाचणी करणार्या राज्यातील 62 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी सात डॉक्टरांचे परवाने रद्द, तर 50 डॉक्टरांचे परवाने निलंबित केले आहेत. राज्यातील 552 सोनोग्राफी केंद्रांविरुद्ध खटले दाखल केले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी नुकतीच विधानसभेत दिली.
आमदार सुधाकर कोहळे, योगेश सागर, प्रा. वर्षा गायकवाड, अमिन पटेल, निर्मला गावित यांच्यासह अन्य आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. गर्भलिंग निदान चाचणी कायद्याने गुन्हा असून 2002 ते जानेवारी 2016 या काळात 552 सोनोग्राफी केंद्रांच्या डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सोनोग्राफी यंत्रांचा गैरवापर, एफ फॉर्मची पूर्तता न करणे, फॉर्ममध्ये आवश्यक माहिती देण्यात त्रुटी ठेवणे, गर्भवती महिलेची नावनोंदणी न करणे, मशीन एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करणे, सोनोग्राफी केंद्र नोंदणीकृत नसणे, अभिलेख पूर्ण नसणे, जाहिरात करणे अशा कारणांमुळे गुन्हे दाखल केले आहेत. आरोपपत्र दाखल झालेल्या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्यासाठी 155 प्रकरणे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे पाठवली आहेत. आतापर्यंत 50 डॉक्टरांचे परवाने निलंबित केले असून 49 डॉक्टरांना ताकीद दिली आहे; तर 11 डॉक्टरांची निर्दोष मुक्तता झाली आहे. एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे, तर एका डॉक्टरचे प्रमाणपत्र बनावट आढळले आहे. सहा डॉक्टरांना सल्ला देण्यात आला आहे, तर 30 प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.