Breaking News

पौर्णिमेला देवगडमध्ये ला भाविकांची मांदियाळी


नेवासा प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या निज ज्येष्ठ पौर्णिमेला तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्तदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ च्या गजराने श्री क्षेत्र देवगडनगरी दुमदुमली होती. दरम्यान बुधवारीदेखील {दि. २७} वटपौर्णिमेनिमित्त भाविकांनी गर्दीचा उच्चांक केला होता.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांचे श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांनी स्वागत केले. दूरवरून आलेल्या प्रत्येक भक्तांची त्यांनी आत्मीयतेने विचारपूस केली. वटपौर्णिमेबरोबरच गुरुवारीदेखील पौर्णिमा आल्याने पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

बुधवारी [दि. २७] आलेल्या वटपौर्णिमेनिमित्त दुपारच्या सत्रात गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते महाआरती झाली. या आरतीला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. घटांचा नाद आणि टाळ्यांच्या गजरामुळे येथील वातावरण दत्तमय बनले होते. आलेल्या सर्व भाविकांच्या सेवेकरीता श्री दत्त मंदिर देवस्थानच्यावतीने हभप बाळू महाराज कानडे, हभप साबे महाराज, महेंद्र फलटणे, अण्णा साबळे, सरपंच अजय साबळे, संत सेवेकरी बदाम महाराज पठाडे, हभप लतीफ महाराज शेख, तात्या महाराज शिंदे, दत्तात्रय सोनवणे, सीताराम जाधव, अंबादास फोलाणे, गोविंदराव शेळके, बंटी महाराज पठाडे, सुरक्षा रक्षक सुकासे, सेवेकरी विष्णू महाराज विधाटे यांनी चोख भूमिका बजावली. गुरुवारीदेखील देवगड येथील भगवान दत्तात्रयाच्या मुख्य मंदिरासह मंदिर प्रांगणातील श्री समर्थ सदगुरु किसन गिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी श्री सिद्धेश्वर मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. सर्वांना शिस्तीत व रांगेत दर्शन घेता यावे, म्हणून स्वयंसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली. आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.