Breaking News

‘प्लास्टिकबंदी’वर शेतकरी गटाचा अनोखा फंडा !



कोल्हार प्रतिनिधी

प्लास्टिक बंदीनंतर अनेक छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. प्लास्टिक बंदीचा फटका प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये दूध विक्री करणा-या शेतक-यांनाही बसला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘शेतकरी ते ग्राहक दूध विक्री केंद्र’च्या माध्यमातून कोल्हार येथील शेतकरी ज्ञानेश्वर खर्डे यांनी शासनाच्या प्लास्टिक मुक्ती व पर्यावरण वाचवा मोहिमेस साथ देत अफलातून कल्पना लढविली आहे. या केंद्रातून त्यांनी ३० रुपये लिटर ऐवजी २८ रुपये भाव देत दूध नेण्यासाठी स्वतःचे भांडे घेऊन येणाऱ्या ग्राहकाला प्रतिलिटरमागे दोन रुपयांची सूट दिली.

शेतकरी ही प्लास्टिक मुक्ती व पर्यावरण वाचवा या मोहिमेत अशा प्रकारे सहभागी होऊ शकत असल्याचे दाखवून देत प्लास्टिक मुक्तीवर कोल्हारच्या या दूध उत्पादक शेतक-यांनी अनोखा फंडा अंमलात आणला आहे. सध्या शेतक-यांना दुधाचे भाव कमी मिळत आहेत. त्यामुळे अडचणीत असलेला दूध उत्पादक आणखी अडचणीत येत आहे. दूध विक्री केवळ प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये करता येते. मात्र प्लास्टिक बंदीमुळे प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये दूध विक्री करण्यात शेतक-यांना आता अडचण निर्माण झाली आहे. यावर पर्याय शोधत व प्लास्टिक मुक्तीस हातभार लावत कोल्हार येथील ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी ज्ञानेश्वर खर्डे यांनी १५ दूध उत्पादक शेतक-यांचा शेतकरी गट तयार केला. यामध्ये १० ते २० लिटर दूध असणारे शेतकरी तर काही अवघे २ ते ४ लिटर दूध उत्पादक आहेत. या शेतकरी गटाच्या माध्यामातून त्यांनी ‘शेतकरी ते ग्राहक’ अशी दूध विक्री सुरु केली होती. मात्र प्लास्टिक बंदीनंतर त्यांना दूध विक्रीस अडचण निर्माण झाली. यावरही त्यांनी पर्याय शोधून काढला.

चौकट

प्लास्टिक मुक्तीचा आगळावेगळा संदेश!

या संकल्पनेमुळे ग्राहकाचा फायदा होत आहे. रोजच्या दुधाची विक्री करणे या शेतकरी गटास सोपे बनले आहे. प्लास्टिकमुक्तीनंतर अनेक व्यापारी शासनाच्या नावाने टाहो फोडत आहेत. मात्र कोल्हार येथील शेतक-यांच्या या गटाने अफलातून संकल्पना राबवित शेतकरी, व्यापारी आणि जनतेला प्लास्टिक मुक्तीचा आगळावेगळा संदेश दिला आहे.