किसान क्रांती आणि राष्ट्रीय किसान महासंघाचा एल्गार! दुधाचे टँकर ओतून केला शासनाचा निषेध
।संगमनेर/प्रतिनिधी।
राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राज्य व केंद्रशासनाच्या विरोधात एल्गार देत आंदोलन सुरु केले. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्येदेखील किसान क्रांती व राष्ट्रीय किसान महासंघाच्यावतीने हाती घेण्यात आले. या आंदोलनात आज {शुक्रवारी} दिवसभर विविध ठिकाणी आंदोलने सुरु होती. यावेळी दुधाचे टँकर रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध करण्यात आला.
गेल्या वर्षी दि. १ जूनला राज्यात शेतकरी आंदोलनाची सुरुवात नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून झाली होती. त्याचे पदसाद राज्यभर उमटल्यानंतर सरकारने त्याची दखल घेत आंदोलकांना आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यानंतर वर्षभरात आंदोलकांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच संगमनेरात नाशिक-पुणे मार्गावरील कर्हे घाटाजवळ गुजरातकडे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक अडविण्यात आला. त्या टेंपोतील टोमॅटो रस्त्यावर फेकण्यात आले. त्यापाठोपाठ नाशिककडून दूध घेऊन जाणारा टँकर अडवून त्यातील दुध एका हॉटेलसमोर रस्त्यावर सोडण्यात आले. दुपारनंतर आंदोलकांनी मोर्चा वडगावपानकडे वळवत तेथेदेखील दुधाचा टँकर अडविला आणि त्यातील दूध रस्त्यावर सोडून देण्यात आले. तर समनापुर शिवारात नगरच्या दिशेने टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक अडवित त्यातील टोमॅटो रस्त्यावर फेकण्यात आले. या आंदोलनाचा फटका आता मोठ्या शहरांना बसण्याची शक्यता आहे. दूध, भाजीपाला आदींसह शेतीमाल दहा दिवस थांबविण्यात येणार अाहे. शुक्रवारी आंदोलनाचा पहिलाच दिवस होता. वडगावपान, तळेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी सायखिंडी फाट्यावर भाजीपाला वाहतुकीच्या ट्रकमधील टोमॅटोचे ४० क्रेट रस्त्यावर फेकून दिले. आंदोलनात ३० ते ४० शेतकरी सहभागी झाले होते.