Breaking News

शिक्षकांच्या मतदार संघात बेरक्या बेडर राजकारण्यांची घुसखोरी; गुरूजनांनीही विकले शिक्षण सौदेबाजांना इमान

नाशिक/कुमार कडलग
लोकशाहीने भारतीयांना दिलेल्या अनेकविध मुलभूत अधिकारांमध्ये मतदानाचा अधिकार सर्वाधिक बहुमोल आणि पविञ मानला जातो. तथापी भारतीय राजकारणात शिरकाव केलेल्या माफिया प्रवृत्तींनी या पवित्र दानाला राजकारणाच्या बाजारात मांडून बोली लावण्याचा उठवळपणा केल्याने लोकशाहीची नग्न धिंड पाहण्याचा दुर्दैवविलास नशिबी आला आहे. लोकसभा विधानसभा अशा निवडणुकांमध्ये मतदान करणारा बहुसंख्य मतदार आजपर्यंत अशिक्षित म्हणून लोकशाहीचा व्यापक अर्थ समजण्याइतपत प्रगल्भ नव्हता, म्हणून या क्षेत्रात मतांचा बाजार मांडणे राजकारणातील माफीयांना सहज सोपे झाले. थोड्याफार प्रमाणात पदवीधर आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात तर मतदार असलेल्या जनविश्‍वस्तांनी कंबरेचे सोडून रस्त्यावर फेकण्याचा निर्लज्जपणा स्वीकारला अर्थात याला काही सन्माननीय अपवाद नक्की आहेत. हीच परिस्थिती संस्कारक्षम पिढी घडवून देशसेवेत रूजू करणार्‍या गुरूजनांचा प्रतिनिधी निवडून देणार्‍या शिक्षक मतदार संघातही दुर्दैवाने निर्माण झाली आहे. शिक्षक मतदार संघाची अवस्था तर अत्यंत दीनवाणी झाली असून मुळ शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या सव्यासी उमेदवाराला या मतदार संघात जागा नाही. सव्यासी गुरूजींनी संस्थाचालकांकडे वेठबिगारी करायची आणि संस्थाचालकांनी निवडणुका लढवून आयुष्यभर गुलाम असलेल्या मतदार शिक्षकांना प्रलोभनं देऊन निवडणूका जिंकायच्या. यंदाच्या निवडणूकीत नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात हे दुर्दैवी वास्तव अधिक प्रखरपणे अधोरेखीत झाले. हे वास्तव प्रातिनिधीक असून सर्वदूर हीच परिस्थिती आहे. राजकारणात प्रस्थापित झालेल्या संस्थाचालकांनी शिक्षक मतदार संघात शिरकाव करून गुरूजींच्या मुलभूत हक्कावर आक्रमण तर केलेच, शिवाय लोकशाही व्यवस्थेची मोडतोड करून आदर्श निवडणूक आचारसंहीतेलाच खुले आव्हान दिले.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात मतदारांचा कौल मागणार्‍या काही उमेदवारांचा शिक्षकी पेशाशी दुरदुरपर्यंत संबंध दिसत नाही. केवळ शिक्षण संस्थांवर मालकी हक्क प्रस्थापीत करून शिक्षकांना आपल्या संस्थेत गुलामासारखी वागणूक देऊन पुन्हा त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या अधिकारावर हक्क सांगतात आणि हे शिक्षक देखील गुमान या संस्थाचालकांच्या ताटाखालची मांजर बनतात.
रोजी रोटीचा सवाल आहे म्हणून हे सारे सोसणे मान्य आहे, पण जेंव्हा निवडणूकीचा प्रचार सुरू असतो तेंव्हा या उमेदवार संस्थाचालकांचा प्रचार करतांना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचार संहीतेच्या चिंध्या करण्यात अग्रेसर असतात. आपण कोण आहोत, आपला पेशा काय आहे, आपल्यावर समाजाने कुठली जबाबदारी सोपविली आहे, याचे कुठलेच भान न ठेवता गुरूजी उमेदवाराच्या प्रचार कार्यात हिरीरीने झोकून देत आपल्या सहकारी मतदारांना मतांसाठी प्रलोभने देतात. मतदार गुरूजीही सहयोगी बंधूने दिलेली बहुमुल्य भेट स्वीकारून आदर्श आचार संहीतेच्या चिंध्या करण्याच्या उमेदवाराच्या दृष्टीने पवित्र कार्याला हातभार लावतात. लोकशाही बळकट करून देश घडविण्याच्या प्रक्रीयेत योगदान देणारी पिढी घडविणारी ही जातकुळी एखाद्या पैठणीच्या बदल्यात आपले अमुल्य मत विकण्यास तयार होत असेल तर विद्यार्थ्यांच्या पिढीने त्यांच्याकडून कुठला  आदर्श घ्यायचा? शिक्षकी पेशात निर्ढावलेल्या अशा काही प्रवृत्तींमुळे या पवित्र क्षेत्रातील खर्‍या सव्यासींना तोंड दाबून बुक्यांचा मार सोसावा लागत आहे.प्रलोभनांना बळी पडणार्‍या या प्रवृत्तींचा विद्यार्थांकडून अनादर होणे स्वाभाविक आहे, असो.
मुळ मुद्दा शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत घसरलेल्या नितीमुल्यांचा आहे.नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात यंदा दिसलेले चित्र अतिशय भयानक आणि विदारक होते. लोकशाहीची थट्टा नव्हे तर वस्रहरण करण्याचे पाप काही गुरूजींच्या हातून जाणते अजाणतेपणे घडले आहे. काही सन्माननीय अपवाद वगळून आणि त्यांची जाहीर माफी मागून अशा घाणेरड्या थराला जाणार्‍या गुरूजींना गुरू दर्जा का द्यावा, असा प्रश्‍न उपस्थित होतो.
नाशिक विभागात अनेक ठिकाणी एका उमेदवाराच्या प्रचारक गुरूजींनी सहकारी मतदार शिक्षकांना पैठणी, साड्या, सुटींग-शर्टींग आणि रोख रकमेची पाकीटे वाटप केल्याची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. इतकेच नाही तर याच उमेदवाराच्या प्रचार कार्यालयातून शिक्षक मतदारांना पार्सल मिळाले का अशी विचारणा करणारे भ्रमणध्वनी जात असल्याचा पुरावा म्हणून ऑडिओ क्लीपही व्हायरल झाल्या आहेत. एका बाजूला या ऑडिओ व्हिडीओ क्लीप व्हायरल होत असतांना आदर्श आचार संहितेचे पालन काटेकोरपणे व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने पाठवले निरिक्षक काय करतात हा प्रश्‍न गंभीर पेच उभा करतो. एकूणच व्यवस्थेच मुसळ आर्थिक प्रलोभनाच्या केरात रूतल्याने अपेक्षा तरी कुणाकडून करणार?
शिक्षक मतदार संघातील घुसखोरी थांबवण्याची योग्य वेळ
आज होणार्‍या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणूक हि शिक्षकांसाठी अंतिम व ऐतिहासिक ठरणार आहे. कारणे अनेक परंतु धनशक्ती आणि गुंडगीरीच्या माध्यमातून येथे होत असलेला शिरकाव, गेल्या 4 वर्षात शिक्षण क्षेत्राची होणारी हेळसांड, अनेकांनी केलेल्या आत्महत्या अनेक कुटुंबात असलेला मानसिक तणाव गुणवत्तेच्या नावाने भूत बनून पाया भरणार्‍या आणि विशिष्ट? महामहोदयांच्या स्टेशनरी वाढवणार्‍या चाचण्या? आणि तरीही अर्थ कारणाने निवडणूक जिंकण्याची मस्ती. असा शिक्षणाचा प्रवास जर पैठणी आणि बंद पाकीटात विकला जात असेल तर नक्कीच एक तर शिक्षण क्षेत्र बरबाद होईल आणि त्या बरोबर महाराष्ट्र ही. परंतु शिक्षकांनी ह्या वेळेला पक्के ठरवले कि सगळे काही घेवून एकाच उमेदवाराला निवडायचे. ज्यांच्या घरात कुटुंबातील अर्ध्याहून अधिक शिक्षक आहेत, ज्यांच्या वडिलांनी आयुष्यातील उमेदीचा काळ टि. डि. एफ्साठी 43 वर्षे घालविला. स्वातंत्र्यानंतर ज्यांनी स्वकष्टाने आणि गावातील लोकांच्या श्रमदानाने संस्था उभारुन जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेर शिक्षण पोहचवले ते कै. आप्पासाहेब बेडसेंचा वारसा पुढे नेणारे गेल्या कित्येक दिवसापासून रात्रीची पहाट करणारे, अहोरात्र कष्ट घेणारे, पाच जिल्ह्यात असे कोणते गाव नसेल त्यांना हा उमेदवार माहिती नसेल असा प्रचार आणि प्रचार करुन शिक्षण क्षेत्रातील समस्या मांडणारा निगर्वी उमेदवार योग्य वेळी मिळाला. ज्या वेळेला तावडीतले शिक्षण विनोद होत असते, त्याच वेळेला शिक्षणातल्या विनोदाला हद्दपार करायची योग्य वेळ आणि संधी आपल्याच हातात असते. रचना वादा पेक्षा विनोदाचा भार जेव्हा शिक्षणावर पडतो, तेव्हा वादा करणारा दादा कामाला येतो हे मात्र विसरता येणार नाही. निवृत्तीनंतर विनोद तब्येतीसाठीच चांगला असतो? परंतु शिक्षणात जर त्याचा वापर 100% केला तर पाया राहून भूत अंगावर बसते, म्हणून मित्रांनो ही अतिम वेळ आहे, या मतदार संघात धनशक्तीचा वापर करुन शिक्षणात जर दारुचे ब्रॅण्ड आलेच तर पैठणी नावालाच लक्ष्मीच्या नावाने आपणच आपल्या घरातील लक्ष्मीला धोक्यात आणू जी आपल्या गैरहजरीत सगळं मॅनेजमेन्ट सांभाळते.आपण याचे भान नक्कीच ठेवणार, कारण चार वर्षात खूप भोगले आता नाही. सर्व बाजूने येणार्‍या प्रतिक्रिया हेच दर्शवतात. उद्या 25 तारीख 2+5=7 आणि मतपत्रिकेतला अनुक्रमांक 16=1+6= 7 म्हणजे 7 पे 7 समझदार को ईशारा-- वादालाच माननार्‍या दादाला मतदान कराल, हा विश्‍वास नव्हे खात्री मतदात्यांनी एकदाच ठरवलेली. चला तर मग एका ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होऊ, या नवपरिवर्तन घडवू या.