Breaking News

मिरजगाव येथील बंद पडलेला बैलबाजार पुन्हा जोमाने सुरू

कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती, जनावरांची झपाट्याने कमी होणारी संख्या, यांत्रिकीकरणाने शेती करण्याचा शेतकर्‍यांचा वाढता कल, यामुळे कधीकाळी अतिशय नावाजलेला मिरजगाव जनावरांचा बैल बाजार, मागील दोन-तीन वर्षांपासून बंद होता. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांची मोठी अडचण होत होती. यामुळे कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने मिरजगाव येथील जनावरांचा बाजार पुन्हा सुरु केला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. बाजार समितीच्या प्रयत्नांना यश आल्याने बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांचे आभार व्यक्त करत आहे. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील बैल बाजार हा जिल्ह्यात जामखेड, काष्टी, राशिन, वाळकी व जिल्ह्याबाहेरल चाळीसगाव सारखे नावाजलेला होता, बाहेरून बैल व्यापारी येथे व्यावसायासाठी येवून बैल खरेदी विक्रीसाठी ही अतिशय गाजलेला व नावाजलेला होता. या ठिकाणी जिल्ह्यातील व राज्यातील जनावरे येत होती. मिरजगावला यामुळे बाजारी गाव म्हणून संबोधले जात होते. मिरजगाव हे फार पूर्वीपासूनच व्यापारी गाव म्हणून ओळखले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून हा परिसरात सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने. त्यावेळी जनावरांच्या छावण्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे जनावराचा बाजार मार्केटबाहेर गेला, त्याचा परिणाम येथील जनावरांच्या बाजारावर झाला. येथील बाजारात जनावरांची आवक कमी होऊ लागली. त्याबरोबरच याठिकाणी बाहेरून येणार्‍या व्यापार्‍यांचे प्रमाणही कमी होऊ लागले. त्यातच याबाजारात शेतकर्‍यांना व व्यापार्‍यांना पुरविण्यात येणार्‍या सुविधा बाजार समितीकडून देण्यात येत नव्हत्या. परिणामी मिरजगावचा जनावरांचा बाजार जनावरांअभावी व बाहेरच्या व्यापार्‍याअभावी बंद पडला
मिरजगाव येथील जनावरांचा बाजार बंद झाल्यानंतर याभागातील शेतकर्‍यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. याभागातील शेतकर्‍यांना जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी बाहेरील दूरच्या बाजारात जावे लागत होते. तसेच बाजारसमितीचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले होते. बाजार समितीच्या संचालक मंडळाने याची दखल घेवून मिरजगाव येथील उपबाजार समितीमध्ये कांदा आडत, लिंबू आडत, व जनावरांचा बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतला. तसेच परिसरातील शेतकर्‍यांना व व्यापार्‍यांना येथे जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी येण्याचे आवाहन केले. त्याला परिसारातील शेतकर्‍यांनी व व्यापार्‍यांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून, याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनावरे येवू लागली आहेत. पर्यायाने मिरजगावचा बाजारही गजबजू लागला आहे.


कर्जत तालुक्यात दुध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. याठिकाणी संकरीत जनावरांची संख्या मोठी आहे. तालुक्यात 35 हजारांपासून ते एक लाखांवर संकरीत गाईच्या किंमती आहेत. मात्र संकरीत बैलांना येथे मागणी नाही. तर शेतीच्या कामांसाठी गावरान किंवा खिलारी बैलांना येथे मोठी मागणी आहे. मिरजगावच्या या बाजारात 50 हजारांपासून ते दीड दोन लाखांवर किंमती आहेत. यामध्ये हौस म्हणून खिलारी बैलांची जोडी सांभाळणे आजही शेतकरी प्रतिष्ठेचे समजले जात आहे. म्हणून कर्जत तालुक्यातील कित्येक शेतकर्‍यांकडे खिल्लारी बैल जोडी आहे.


कर्जत तालुक्यातील राशीन, व मिरजगाव वगळता थेट काष्टी, घोडेगाव, याठीकानीच जनावरांचे बाजार भरविले जातात त्यामुळे याभागातील शेतकर्‍यांची चांगलीच सोय झाली आहे. तसेच येथील शेळ्यामेंढ्यांचा बाजारही आता गर्दीने फुलू लागला आहे. यांत्रिकीकारणाकडे शेतकरी कितीही झुकला तरी, आपल्या दारात दोन का होईना जनावरे असावीत अशी बहुतांशी शेतकर्‍यांची धारणा असल्याने जनावरांना व त्यांच्या होणार्‍या खरेदी-विक्रीला काहीच पर्याय नसल्याचे बोलले जाते. आता ही जनावरांच्या बाजाराची सोय झाल्याने शेतकरी आनंदात आहेत. व बाजारसमितीच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानताना दिसत आहेत.


चौकट:- 
मिरजगावचा जनावरांचा बाजार बंद झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांची व व्यापार्‍यांची खूप अडचण होत होती. ही अडचण दूर करण्यासाठी बाजार समितीने शेतकर्‍यांना व व्यापार्‍यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे येथील जनावरांचा बाजार पूर्वीपेक्षाही चांगल्याप्रकारे प्रकारे भरणार आहे. त्यासाठी बाजार समिती प्रयत्न करत आहेत. बाजरकरूंना व येथे येणार्‍या शेतकर्‍यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची बाजार समितीकडून दक्षता घेण्यात येत आहे. येथे कोणाचीही अडवणूक होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.
- कृषी उ.बा.स. सभापती श्रीधर पवार


मिरजगाव येथे जनावरांचा बाजार सुरु झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांना, जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी बाहेर इतरत्र जाण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना आता पूर्वीप्रमाणेच गावांत जनावरांचे व्यवहार करता येणार आहेत. 
-शेतकरी अजिनाथ म्हेत्रे