Breaking News

आईच्या मृत्युचे दु:ख सावरत मिळवले 92.40 टक्के गुण


अहमदनगर/प्रतिनिधी।
जन्मदात्या आईच्या मृत्यूचे दु:ख सर्वाधिक वेदनादायी असते,एक प्रकारे दु:खाचा डोंगरच कोसळत असतो, यातून सावरण्यासाठी खूप कालावधी लागत असतो, मात्र सारोळा कासार येथील अश्‍विनी चांगदेव कडूस या शेतकर्‍याच्या मुलीने आईच्या मृत्युचे दु:ख सावरत 10 वी च्या परीक्षेत तब्बल 92.40 टक्के गुण मिळविले आहेत.तिचे हे यश परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे.
शेतकरी चांगदेव कडूस हे सारोळा कासार मध्ये आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत राहतात.त्यांना 3 मुली आहेत.सर्वात मोठी अश्‍विनी 10 वी उत्तीर्ण झाली आहे.दुसरी गौरवी 6 वर्षाची तर तिसरी सृष्टी अवघी 3 वर्षाची आहे.चांगदेव यांच्या पत्नीचे म्हणजेच अश्‍विनीच्या आईचे काही महिन्यांपूर्वी अल्प आजाराने अकाली निधन झालेले आहे.आईचे छत्र हरपल्याने तिन्ही लहान बहिणी आईच्या मायेला पारख्या झाल्या आहेत.ऐन 10 वी चे वर्ष असताना अश्‍विनीवर दु:खाचा डोंगर कोसळला.पण तिने या दु:खातून सावरत दोन लहान बहिणींना मायेचा आधार देत वृद्ध आजी आजोबांच्या आधाराची काठी होत, घरकाम सांभाळून 10 वीच्या परीक्षेची तयारी केली.वडिलांचा शेतीचा आणि दुधाचा व्यवसाय,त्यामुळे घरातील गोठ्यात असलेल्या गायींचा शेनकुर करत, त्यांना चारापाणी करत व घरातील धुणीभांडी ही कामे सांभाळत असताना अभ्यासात मात्र कधीही खंड पडू दिला नाही.त्यामुळे मार्च मध्ये झालेल्या 10 वी च्या परीक्षेला ती अतिशय आत्मविश्‍वासाने सामोरे गेली.