स्वीस बँकेतील भारतीयांच्या पैशात 50 टक्क्यांची वाढ पैसे परत आणण्याच्या सरकारच्या वल्गना फोल
नवी दिल्ली : स्वीस बँकेत ठेवलेल्या भारतीयांच्या पैशात 2017मध्ये चक्क 50 ट्क्क्यांनी वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे स्वीस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा परत आणण्याच्या मोदी सरकारच्या वल्गना फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वीस बँकेच्या वार्षिक अहवालात हे समोर आले असून बँकेच्या परदेशी गुंतवणुकीत तीन टक्के वाढ झाली आहे. स्वीस राष्ट्रीय बँकेच्या अहवालानुसार, 2017मध्ये स्वीस बँकेत भारतीयांचे एकूण 7 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. भारत सरकार विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन दिलेले असतानाच, अहवालात स्पष्ट झालेल्या या आकड्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 2016मध्ये स्वीस बँकेतील भारतीयांच्या पैशात 45 ट्क्क्यांची घट झाली होती. ही घट आतापर्यंतच्या बँकेच्या इतिहासातील विक्रमी घट मानली गेली होती. आतापर्यंत तीन वेळा स्वीस बँकेतील भारतीयांच्या ठेवीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 2011 मध्ये 12 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती तर, 2013 मध्ये 43 टक्के आणि आता 2017 मध्ये 50.2 टक्क्यांची वाढ झालेली आहे. 2004ला सर्वात जास्त वाढ नोंदवली होती. त्यावेळी 56 ट्क्क्यांची वाढ भारतीयांच्या पैशात झाली होती.