नोकरीसाठी 4 लाखांचा दर : अॅडव्हान्स घेवून फसवणूक
सातारा, दि. 23, जून - सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोडोली येथील एकाची फसवणूक करणार्या प्रतीक्षा भोसले या महिलेविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही नोकरी विकण्यासाठी 4 लाखांचा दर काढला होता. त्यापैकी व्यवहार ठरल्यानंतर त्यातील 85 हजार रुपये संशयित महिलेला दिले होते.याबाबत मुरलीधर जावळे यांनी तक्रार दिली. प्रतीक्षा भोसले यांच्या आई सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. मात्र नोकरीवर असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाल्याने अनुकंपा तत्त्वावर प्रतीक्षा भोसले यांनी पालिकेत नोकरीचा दावा केला. त्यानुसार प्रतीक्षा यांचा दावा मंजूर करण्यात आला. मात्र पालिकेची नोकरी करण्यास प्रतीक्षा भोसले यांची तयारी नव्हती. याचदरम्यान प्रतीक्षा यांना कोडोली येथे राहणारे मुरलीधर जावळे हे भेटले. या भेटीत जावळे यांनी तुमच्या जागेवर माझ्या पत्नीला नोकरी लावा, असे प्रतीक्षा यांना सांगितले. यावेळी संशयित प्रतीक्षा यांनी ही नोकरी सोडण्यासाठी साडेचार लाख रुपयांची मागणी केली. संबंधित रक्कम दिल्यानंतर प्रतिज्ञापत्र तयार करुन त्या नोकरीचा वारस तुमची पत्नी असेल, असे लिहून देते, असे तिने सांगितले. त्यानुसार चार लाखाला व्यवहार ठरला. त्यानंतर मुरलीधर जावळे यांनी संशयित प्रतीक्षा भोसले यांना 1 ते 12 जून 2017 या कालावधीत वेळोवेळी 85 हजार रुपये दिले. त्यानंतरच्या काळात जावळे यांनी प्रतीक्षा भोसले यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र त्यांनी दाद दिली नाही आणि नोकरी लावण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे तक्रार देण्याशिवाय जावळे यांच्याकडे पर्याय राहिला नाही.