Breaking News

राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीजवापराचे ऑडिट करणार

महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येणार्‍या राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांत स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राळेगणसिद्धी येथे सोमवारी (दि. 4) जाहीर केले. यामुळे शेतीपंपाचा वीजवापर निश्‍चित होऊन वीजबिलांबाबत तक्रारी राहणार नसल्याची अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतीपंपाचा वीजवापर आणि वीजबिल यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्‍नाबाबत ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी ही माहिती दिली.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील शेतकर्‍यांना येणार्‍या वीजबिलाबाबत प्रश्‍न उपस्थित करणारे पत्र ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांना पाठविले होते. या पत्राची तातडीने दखल घेऊन ना. श्री. बावनकुळे यांनी सोमवारी सायंकाळी अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन राज्य शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, शेतीपंपाचा वीजवापर निश्‍चित करण्यासाठी आयआयटीसारख्या नामांकित संस्थेकडून राज्यातील सर्वच शेतीपंपांच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्हानिहाय ऑडिट केले जाईल. या ऑडिटनुसार त्यानंतरच्या तीन महिन्यात हे बिल वसूल केले जाईल. कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला असून शेतीपंपाची थकबाकी 29 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. शेतकर्‍यांकडे व्याज, दंड वगळता 18 हजार कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. ऑडिटनंतर वीजबिलाबाबतच्या तक्रारी संपुष्टात येतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला जमीन देणार्‍या गावातील शेतकर्‍यांना दिवसा अखंडित वीज देण्याचे धोरण आखल्याचे ना. श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू शकणार्‍या या योजनेला अधिक गती देण्यात येत आहे. राळेगणसिद्धी येथे या योजनेतून साकारत असलेल्या दोन मेगावॉट प्रकल्पाची पाहणी त्यांनी केली. या प्रकल्पाची आणखी तीन मेगावॉटने क्षमता वाढविण्यास मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सकारात्मक चर्चा व उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले.