Breaking News

कर्ज फेडण्यासाठी विजय माल्या विकणार 13 हजार 900 कोटींची संपत्ती

नवी दिल्ली - भारतातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवणारा उद्योजक विजय माल्याने त्याची संपत्ती विकून कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबतचा अर्ज माल्या आणि युबीएचएलने कर्नाटक उच्च न्यायालयात 22 जून 2018 ला सादर केला आहे. जवळपास 13 हजार 900 कोटींची संपत्ती विकून आपण हे कर्ज फेडणार असल्याचे माल्याने या अर्जात म्हटले आहे. मी पळपुटा नसून कर्ज फेडण्याचा माझा प्रामाणिक हेतू आहे, असेही त्याने म्हटले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तब्बल 2 वर्षानंतर मौन सोडत माल्याने त्याला कर्ज बुडव्यांचा पोस्टरबॉय केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणामुळे जनतेचा आपल्यावर रोष असल्याचेही त्याने मान्य केले. 62 वर्षीय माल्याने 2016 मध्ये देशातून पलायन केले आहे. तेव्हापासून तो लंडनमध्ये राहत असून विविध प्रकरणांतर्गत ईडी तसेच न्यायालयासमोर हजर राहण्याचे समन्स बजावूनही तो अजुनही भारतात आलेला नाही.