भिडेंना अटक करा; अन्यथा विधानभवनाला घेराव
मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचारातील मुख्य आरोपी मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करावी अन्यथा येत्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालू असा इशारा संभाजी ब्रिगेडने आज दिला. संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते बोलत होते. सरकार आणि मुख्यमंत्री जाणीवपूर्वक मिलिंद एकबोटे आणि मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप भानुसे यांनी यावेळी केला. मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी भाजपाने तथाकथित स्वयंघोषित सत्यशोधन समिती तयार केली असून, ती समिती मुख्य आरोपींवरून लक्ष विचलित करून दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी भानुसे यांनी केला.