Breaking News

खरिप हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले!

सोनई- खरिपाचा हंगाम तोंडावर आला असताना शेतकरी कर्जमाफी देऊन भाजपा सरकारने शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा केलीच नाही. सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँका शेतकरी वर्गाला कर्ज देण्यास नकार देऊ लागल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतकरीवर्गाचे तोंडाचे पाणी पळाले आहे. 

भाजपा सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा न केल्यामुळे पुढील कर्जास शेतकरी पात्र नाहीत. त्यामुळे नवीन कर्ज देण्यासाठी बँका नकार घंटा देऊ लागल्या आहेत. हवामान खात्याने यंदा पाऊस चांगला होईल, असे सांगितल्याने खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. नांगरणी बियाणे खरेदी करणे आदींसाठी पैशांची आवश्यकता भासत आहे. मात्र बँकांनी नकार दिल्यामुळे शेतकरी नाईलाजास्तव खाजगी सावकाराकडे वळला जात आहे. शासनाने कर्जमाफीनंतर रक्कमा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा कराव्यात. निव्वळ घोषणा करून शेतकऱ्यांची हहेळसांड थांबवावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंद्याकडे पहिले जाते. मात्र आजची परिस्थिती पाहता या शासनाच्या काळात दुधापेक्षा पाण्याचे दर जास्त आहेत. एक लिटर दुधाला पंधरा रुपये भाव तर एक लिटर पाण्याची बिसलरी बाटली २० रुपयाला मिळते. त्यामुळे दूधधंदासुध्दा न परवडणारा झाला. आज बाजारात खाद्याचे दर पाहता शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. मात्र शासन नुसत्या घोषणाच करत आहे. प्रत्यक्षात कृतीत काहीच नाही. विम्याचे पैसे नाही, गारपिटीचे पैसे नाही. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

ऊसशेतीसुद्धा अडचणीत आल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. साखरेला भाव नसल्याने साखर कारखाने सुद्धा एफआरफीप्रमाने भाव देण्यास टाळाटाळ करू लागले आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता शेती धंदा हा न परवडणारा झाला आहे. खरिपाच्या हंगाम तोंडावर आला असताना शेतीची मशागत व बियाणे करीत शेतकऱ्याकडे पैसे नाहीत. त्यातच कर्जमाफी करूनसुद्धा बँका पुढील कर्ज देण्यास टाळाटाळ करू लागल्या आहेत. याचा विचार करून शेतकऱ्यांना नवीन कर्जे देण्याचे आदेश द्यावेत, अशी माफक अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे.