Breaking News

सरपंचपदाचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड

राहुरी ता. प्रतिनिधी - आगमी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतच्या सुभेदा-या आपल्याच ताब्यात राहणाऱ्यासाठी तालुक्याच्या गावपुढा-यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. आपआपल्या सुभेदारी ताब्यात ठेवण्यासाठी श्रेष्टींच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतचे बुरुज जिंकण्यासाठी सर्वतोपरी जय्यत तयारी सुरु झाली आहे. 

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या दि. २७ मे रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज {दि. १२} सदस्य आणि सरपंचपदाचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयाच्या आवारात गावपुढार्यांची झुंबड उडाल्याचे दिसून आले.

दि. २७ मे रोजी राहुरी तालूक्यातील मोमीन आखाडा, धामोरी बुद्रूक, धामोरी खुर्द, तमनर आखाडा, देसवंडी, ब्राम्हणी, बारागांव नांदूर, गंगापूर, घोरपडवाडी, म्हैसगांव, दरडगाव थडी या ११ ग्रामपंचायत व टाकळीमियाँ, ब्राम्हणगांव भांड या दोन ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूका अशा एकूण १३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहेत. यासाठी आज {दि. १२} भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात काही घोषित तर काही स्वयंघोषित पुढार्यांनी गर्दी केली होती. १३ ग्रामपंचायतींसाठी दुपारपर्यंत हजारो अर्ज प्राप्त झाले होते. यावेळी राहुरीचे नायब तहसीलदार जी. एस. तळेकर हे कामकाजावर लक्ष ठेवून होते. अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत १६ मे आहे. तोपर्यंत तालुक्यात मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

यापैकी सर्वात महत्वाची व तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बारागांवनांदूरची ग्रामपंचायत मानली जाते. ही ग्रामपंचायत अनुसूचित जाती प्रवर्ग महिला राखीव असल्याने या ग्रामपंचायतमध्ये कोण बाजी मारणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. ही ग्रामपंचायत तनपुरेंच्या नेतृत्वाखाली जनसेवाच्या ताब्यात आहे. येथील निवडणूक रंगतदार व अटीतटीची ठरणार आहे. जि. प. सदस्य शिवाजी गाडे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या नेत्याच्या ताब्यात सत्ता ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काही ठिकाणी ओल्या व सुक्या पार्ट्या जोर धरु लागल्या आहेत. मात्र मतदार पार्ट्या झोडून कोणाला मतदान करणार, हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे. आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या १३ ग्रामपंचायतच्या लढाईकडे तालुक्याचे आणि राजकीय समिक्षकांचे लक्ष लागले आहे.