आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती कायम
विधान परिषद निवडणुकीत पडद्यामागे भाजपसोबत युती करतानाच शिवसेनेने स्वबळाचा नारा देऊन सातत्याने भाजपवर टीकास्त्र सुरू ठेवल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती कायम राहील, असे स्पष्ट केल्याने नाराज शिवसेनेला पुन्हा गोंजारण्याचे काम भाजपचे नेते करीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवरुन महाराष्ट्रात भाजप आणि सेनेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवसेनेचं हे वागणं बरं नव्हं’ अशा शब्दात कानपिचक्या देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.