Breaking News

पदवीधर मतदारसंघासाठी कोकणातून भाजपतर्फे डॉ. विनय नातू


रत्नागिरी, दि. 12, मे - विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून गुहागरचे माजी आ. आणि भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपचाच बालेकिल्ला आहे. मात्र राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत भाजपची मक्तेदारी मोडून काढली होती. मात्र भाजप पुन्हा या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्याच्या तयारीत आहे.

विधान परिषदेच्या कोकण मतदारसंघाची निवडणूक जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे या मतदार संघाचे सध्या प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे डॉ. नातू यांनी सांगितले. पक्षाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. संधी मिळाल्यास आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत एक लाख 9 हजार मतदारांची नोंदणी झाली होती. आगामी निवडणुकीसाठी आतापर्यंत 90 हजार 252 इतकी मतदार नोंदणी झाली आहे. गेल्या वेळेपेक्षा मतदारांची 20 हजारांनी घटली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.