योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिकार्यांनी काटेकोर नियोजन करावे -खा. आढळराव पाटील
पुणे, दि. 12, मे - केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांच्या अधिकार्यांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष तथा खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक विधानभवन सभागृहात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
पाटील म्हणाले, जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणेकरुन प्राप्त निधी वेळेत खर्च होईल. तसेच काही विकास कामे तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणीमुळे प्रलंबित असल्यास त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करावा. या कामात हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. खा. अमर साबळे म्हणाले, बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांवर तात्काळ कार्यवाही करुन संबंधित अधिकार्यांनी केलेल्या कामांची माहिती पुढील बैठकीत सादर करावी.
