Breaking News

खेडला ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीकडुन भाजपचा दारुण पराभव


कुळधरण - कर्जत तालुक्यातील खेड, औटेवाडी, करमनवाडी, गणेशवाडी व वायसेवाडी येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे दोन , भाजपाकडे दोन तर एका ठिकाणी स्थानिक आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले. दोन पंचवार्षीकपासुन भाजपाची सत्ता असलेल्या खेड ग्रामपंचायतीत सत्तापालट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंचासह सर्वच बारा जागेवर उमेदवार जिंकल्याने भाजपाचा सुपडा साफ झाला. या भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने इतरांना सोबत घेत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे येथे सत्तांतर होऊन भाजपला पराभवाच्या धक्क्याला सामोरे जावे लागले. ओबीसी महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर अमृता सोमनाथ वाघमारे सरपंचपदी निवडुन आल्या.

औटेवाडी ग्रामपंचायतीत स्थानिक विकास आघाडीला यश मिळाले. देविदास आबासाहेब महाडिक यांची सरपंचपदी वर्णी लागली. वायसेवाडी ग्रामपंचायतीतही सत्तांतर झाले. भाजपकडील सत्तेवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजयाचा झेंडा रोवण्यात यश मिळाले. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच जागेवरील उमेदवार विजयी झाले असून पल्लवी रविंद्र महारनवर यांची सरपंचपदी निवड झाली.

करमनवाडी येथे भाजपाचे भरत संभाजी पावणे यांची सरपंचपदी निवड झाली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेली. जनरल महिलेसाठी राखीव असलेल्या सरपंच पदासाठी गणेशवाडी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली सत्ता भाजपकडे गेली. सरपंचपदी पल्लवी रविंद्र महारनवर यांची निवड झाली. निकाल लागताच विजयी उमेदवार व सरपंच यांनी राशिनच्या जगदंबा देवीचे दर्शन घेतले. राशिन, कर्जत येथे नवनिर्वाचित सरपंच व उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. खेड, करमनवाडी, गणेशवाडी, औटेवाडी येथे सत्कार समारंभ तसेच मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. फटाके फोडुन गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला.

करमनवाडीच्या सरपंचपदी भरत पावणे - करमनवाडी ग्रामपंचायतीत खेड सेवा संस्थेचे माजी चेरमन भरत संभाजी पावणे यांनी 181 मतांनी सरपंचपद मिळविले. माजी पंचायत समिती सदस्य धनराज कोपनर, सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन विजय पावणे, प्रा.अशोक पावणे, भरत लांबोर, आगत पावणे आदींनी संघटित येवुन येथे करिश्मा दाखविला. गोरख पावणे, सुंदर पावणे, रमेश मेगेर, शरद पावणे, बापु हराळे, काशीनाथ खराडे, माणिक पावणे, भानुदास पावणे,सुनिल हराळे,भूषण दोरगे आदींनी परिश्रम घेत भरत पावणे यांची सरपंचपदी वर्णी लागल्याची माहिती विजय पावणे यांनी दिली. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी भरत पावणे यांचे दुरध्वनीवरून अभिनंदन केले. उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी कर्जत येथे सत्कार केला. करमनवाडी येथे भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.