Breaking News

नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायतीचे संमिश्र निकाल


नेवासा - तालुक्यातील भानसहिवरे व मुकींदपूर या प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये लक्षवेधी लढत झाली. भानसहिवरे येथे पन्नास वर्षानंतर सत्तांतर झाले. मुकींदपूरमध्ये पिचडगाव, खुणेगाव व नागापूर ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. पोटनिवडणुकीत व ग्रामपंचायतीवर शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी पक्षाने वर्चस्व राखले असले तरी स्थानिक पातळीवरील राजकारण असल्याने प्रत्येक जण आपआपला दावा करत आहे. भानसहिवरा येथे 15 सदस्य, मुकींदपूर 13 सदस्य तसेच पिचडगाव, खुणेगाव व नागापूर या तीन ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी 7 या प्रमाणे एकूण 43 सदस्य व 5 सरपंच निवडले गेले. 43 सदस्यासाठी 88 तर 5 सरपंचपदासाठी 15 उमेदवार उभे होते. खेडले परमानंद ग्रामपंचायतीच्या एक जागेच्या पोटनिवडणुकीसाठी 2 उमेदवार, शनी शिंगणापूर येथे 1 जागेसाठी 3 उमेदवार, लांडेवाडी येथे 2 जागेसाठी 5 उमेदवार असे 4 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी 10 उमेदवार रिंगणात होते. वरखेड येथे शेषराव भाऊराव शिरसाठ तर तरवडी येथे आत्माराम लक्ष्मण दरवडे हे दोघे पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहे.

भानसहिवरे ग्रामपंचायत सरपंच यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे मीनाबाई किशोर जोजार (2391 विजयी), रेणुका जनार्धन पटारे (1623), प्रीती अरुण वंजारे (62), रंजना रमेश साळवे (187). या ग्रामपंचायतीमध्ये चौरंगी लढतीत शंकरराव गडाख यांचे समर्थक पंचायत समितीचे सदस्य किशोर जोजार यांच्या पत्नी मीनाबाई किशोर जोजार यांनी 768 मतांनी भाऊसाहेब पटारे यांची सून आणि ज्ञानेश्‍वर कारखान्याचे संचालक जनार्धन पटारे यांच्या पत्नी रेणुका जनार्धन पटारे यांचा पराभव करत गेल्या पन्नास वर्षानंतर ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले. या निकालामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. भाऊसाहेब पटारे यांचे ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता होती. विद्यमान सरपंच देविदास साळुंके यांच्या पत्नीलाही पराभवाला सामोरे जावे लागले. ग्रामपंचायतीत एकूण 15 सदस्य निवडून आले. 15 पैकी 11 उमेदवार किशोर जोजार गटाचे निवडून आले तर 4 पटारे गटाचे निवडून आले आहे. विशेष म्हणजे रात्री 9 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. या मतदानाने अनेकांची गणिते मोडीत निघाली. नागापूर ग्रामपंचायतीत तिरंगी लढत झाली. सरपंचांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे संदीप किसन कापसे (298 विजयी), अर्जुन एकनाथ कापसे (223), तुषार सुभाष काळे (1) असे मते मिळाली. या ठिकाणी सोसायटीचे माजी अध्यक्ष अर्जुन कापसे यांचा संदीप कापसे यांनी 75 मतांनी पराभव केला. मुकींदपूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे सतीश उर्फ दादा विष्णू निपुंगे (1610 विजयी), ज्ञानदेव मोहिनीराज निपुंगे (769), कमलेश मोगल गायकवाड (187), संतोष सूर्यभान निपुंगे (102) या ठिकाणी चौरंगी लढत झाली. सतीश विष्णू निपुंगे या पुतण्याकडून ज्ञानदेव मोहिनीराज निपुंगे काकांचा 841 मतांनी पराभव केला. ज्ञानदेव निपुंगे यांनी अनेक वर्षे सरपंचपदी विराजमान होते. नवख्या सतीश निपुंगे यांनी पराभव केल्याने हा धक्कादायक निकाल समजला जातो. सतीश निपुंगे हे पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उभे होते त्यांना पराभव पत्करावा लागला होता . त्याची उणीव या निमित्ताने भरून निघाली. एकूण 13 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत 10 जागा सतीश निपुंगे यांच्या गटाला मिळाल्या तर 3 जागेवर ज्ञानदेव निपुंगे यांच्या गटाला मिळाल्या आहेत. विद्यमान सरपंच सतीश निपुंगे हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचे समर्थक मानले जातात.

खुणेगाव ग्रामपंचायतीत सरपंचांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे छाया भाऊसाहेब काळे (348 विजयी), संगीता प्रमोद पवार (292) या ठिकाणी दुरंगी लढत झाली. या ठिकाणी 7 सदस्य निवडून आले. खुणेगाव येथील यापूर्वीच भाऊसाहेब कदम, संदीप गायकवाड, रेखा कदम, संजय कदम, बेबी सय्यद, नीता कदम हे सहा सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. या ठिकाणी एका सदस्यासाठी व सरपंचपदासाठी निवडणूक झाली. पिचडगाव ग्रामपंचायतीत साखरबाई बाबुराव कामठे यांना 463 मते मिळून विजयी झाल्या . तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संभाजी मच्छिन्द्र शिंदे यांना 349 मते मिळाली. या ठिकाणी 7 सदस्य संख्या आहे. खेडले परमानंद ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सोनाली संदीप बडे यांना 203 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी पूनम राजेंद्र बडे यांना 152 मते मिळाली आहे. या ठिकाणी सरपंचपद राखीव आहे त्यामुळे सोनाली बडे या सरपंचपदाचे दावेदार आहेत. लांडेवाडी ग्रामपंचयत पोटनिडणुकीत नीता तात्यासाहेब लांडे यांना 195 मते मिळून विजयी झाल्या तर प्रतिस्पर्धी आरती शशिकांत लांडे याना 138 मते मिळाली. लांडेवाडी येथे चार पैकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. शनी शिंगणापूर पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली. या ठिकाणी रामेश्‍वर मच्छिन्द्र भूतकर हे 315 मते मिळून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब बापूसाहेब कुर्‍हाट 172 तर सयाराम शिवाजीराव शेटे यांना 41 मते मिळून पराभव पत्करावा लागला.

सकाळी नेवासे तहसील कार्यालयात तहसीलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजनीस प्रारंभ झाला. अवघ्या अडीच तीन तासात सर्व ग्रामपंचायतीचे निकाल लागले. पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी तहसिलसमोर गुलालाची तसेच शिट्ट्या वाजवत आपला आनंद व्यक्त केला. भानसहिवरे व मुकींदपूर (नेवासे फाटा) येथे फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. स्थानिक राजकारण आणि गट तट असल्यामुळे आम्ही सर्वच नेत्यांच्या बाजूने असल्याचे विद्यमान सरपंचांनी सांगितले.