शेतकऱ्यांना मिशन मोडवर पीककर्ज पुरवठा करा- मुख्यमंत्री
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील महिना-दीड महिना महत्त्वाचा असून खरीपात गुणवत्तापूर्ण बियाणे,खते पुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवण्याची आवश्यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे, अशांना नव्याने कर्ज मिळते की नाही याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभागाच्या यंत्रणेची मदत घेऊन खरीप पीक कर्ज पुरवठ्याचे जिल्हानिहाय नियोजन मिशन मोड मध्ये करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच पीक उत्पादन वाढीतील जलसंधारणाचे महत्त्व ओळखून येत्या महिन्याभरात राज्यात जलयुक्त शिवारची कामेही युद्धपातळीवर पूर्ण करणे गरजेचे आहे. शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे आणि आगामी खरीप हंगाम यशस्वी करुन दाखवावा असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते,आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पदुममंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर,गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, दीपक केसरकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार, आदींसह विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रिझर्व्ह बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाबार्डचे अधिकारी, कृषी विभागातील उच्चपदस्थ, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती आदी उपस्थित होते.