Breaking News

समृद्ध, शिक्षित समाजाला संस्काराची गरज


कोपरगाव ता. प्रतिनिधी - समाजात माणसाने सर्वच क्षेत्रात प्रगती साधली असल्याने समाज समृद्ध झाला. त्याच तुलनेने शिक्षितही झालेला आहे. परंतु गतकाळात त्याला चांगल्या संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन हभप शिवाजी महाराज भालुरकर यांनी येथे केले.

कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे सालाबादप्रमाणे नृसिंह जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित भाविकांना ते बोलत होते. ते म्हणाले, भगवान श्रीकृष्णांनी भगवान नृसिंहचा अवतार फक्त एकाच भक्तासाठी घेतला आहे. भगवंतांची अनंत रूपे आहेत. भगवंतांनी वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. परंतु नृसिंहाचा अवतार हा विशेष अवतार आहे. भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी हा अवतार घेतला आहे. आज सर्व कार्यालयाच्या ठिकाणी भगवान दत्तात्रयाचे मंदिर असते. ब्रम्ह, विष्णू व महेश या तीन देवतांचे ते प्रतिक आहेत. म्हणजेच सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या तीनही गुणांचा एकाच ठिकाणी वास आहे. विष्णूला मानणारे, ब्रम्ह देवाला मानणारे व महादेवाला मानणारे असे सर्व भक्त दत्तात्रयाच्या ठिकाणी नतमस्तक होतात. म्हणून दत्त मंदिर सर्व शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळते. भगवान नृसिंहाचा अवतार हा खांबातून प्रकट झालेला आहे. शरीर मानवाचे व डोके सिंहाचे आहे म्हणून या अवताराला नृसिंह असे म्हणतात. भगवान नृसिंहाने भक्त प्रल्हादाला वाचविण्यासाठी अवतार घेतला व हिरण्यकश्यपूचा वध केला. दरम्यान, यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संगीतसाथ शिवाजी महाराज ठाकरे, कृष्णा म. लकारे, पावडे महाराज यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संदीप वाळुंज, दीपक चौधरी, अशोक काजळे, अप्पासाहेब काजळे, जनार्दन जगताप, वसंत भाकरे, किशोर तायडे, सिध्दांत गोसावी, परसराम गिरी, योगेश जगताप, निकेश काजळे, सचिन चौधरी, शुभम चौधरी, अमोल भाकरे, अरुण भाकरे, अरुण काजळे, परसराम शिराळे, सुनील काजळे आदींनी परिश्रम घेतले.