पार्किंग पॉलिसीच्या नावाखाली जीझिया कर वसूली होणार - सचिन साठे
पुणे, दि. 12, मे - पिंपरी चिंचवड मनपाच्या झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ‘पार्किंग पॉलीसीला’ मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड मनपात भाजपाची सत्ता येऊन चौदा महिने झाले. मागील वर्षी पाणीपट्टी दरात आणि मिळकत दरात अन्यायकारक वाढ करुन सत्ताधा-यांनी गोरगरीबांवर छुपी करवाढ लादली. हे कमी म्हणून आता पार्किंग पॉलीसीच्या नावाखाली जीझिया कर वसूली वाहन धारकांकडून वसूल करण्यात येणार आहे.
वस्तुत: प्रत्येक वाहनधारक हा वाहन खरेदी वेळीच रस्ता कर (ठेरव ढरु) भरत असतो. शहरात नागरिकांना आवश्यक तेवढे वाहनतळ उपलब्ध करुन देणे हि मनपाची जबाबदारी आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी, आहेत्या नियमांची अंमलबजावणी व नागरीकांमध्ये या बाबत जागरुकता निर्माण करण्याएैवजी भाजपाचे नेते आपल्या ठेकेदार कम कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी एक नवीन कुरण निर्माण करुन देत आहेत, अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रक ात केले आहे.
चारचाकी वाहनासाठी वर्षाला नऊ हजारांहून जास्त कर आकारला जाणार आहे. हि रक्कम एखाद्या सदनिकेच्या किंवा व्यापारी, वाणिज्य गाळ्याच्या वार्षिक मिळकतीपेक्षा जास्त आहे. पुणे, मुंबई मनपाच्या धर्तीवर हा कर आकारला जाईल असे सांगण्यात आले. परंतू या शहरातील नागरीकांना भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही. यात अनाधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकर रद्द करणे, बंद जलवाहिनीतून चोविस तास मुबलक स्वच्छ पाणी पुरवठा करणे, रोजगारात वाढ करणे, शहरातील गुन्हेगारीवर, वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय उभारणे, कचरा व्यवस्थापन करणे, नद्यांचे संवर्धन, महिला सक्षमीकरण करणे, ज्येष्ठांना सुविधा देणे, शहरातील क्रिडांगणे विकसित करणे, शहरात वायफाय सुविधा सुरु करणे, प्राधिक रणातील घरे फ्री होल्ड करणे, सुसज्ज भाजी मंडई उभारणे, झोपडपट्ट्यांचे पुर्नवसन व आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित भुखंड विकसित करणे, चाकण पर्यंत मेट्रो सुरु करणे, शहरात सरकारी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे अशी शेकडो आश्वासने भाजपाने निवडणूकीपुर्वी शहरवासीयांना दिली होती. जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. याला भुलून शहरातील मतदारांनी भाजपाला एकहाती सत्ता दिली. दिलेल्या आश्वासनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन उलट जनतेच्याच खिशातील पैसा लुटून भाजपाचे ठेकेदार, कार्यकर्ते पोसण्यासाठी पार्किंग पॉलीसीच्या गोंडस नावाखाली जनतेकडून जीझिया कर वसूल करण्याचे काम हे प्रशासन करीत आहेत.
