Breaking News

गणेशोत्सव मिरवणूक उत्साहात पार पाडावी - डॉ. रणजीत पाटील

अकोला, दि. 02, सप्टेंबर - गणेशोत्सव जिल्हयात मोठया प्रमाणात साजरा केला जातो. गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणूक मोठया प्रमाणात अकोला शहरात  काढण्यात येते. ही मिरवणूक शांततेने पार पाडावी त्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. तरी नागरीकांना आवाहन करण्यात येते की, गणेश  विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडावी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केली.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात गणेशोत्सव शांतता कमिटीची आढावा बैठक पालकमंत्री यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते यावेळी  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय ,पोलीस अधिक्षक राकेश कलासागर अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर , मनपा आयुक्त अजय लहाने, गणेशोत्सव  शांतता कमिटीचे अध्यक्ष ड. मोतीसिह मोहता यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावर्षी अपुरा पावसामुळे गांधीग्राम येथे पुर्णा नदीत गणपती विसर्जनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही यासाठी पर्यायी व्यवस्था बाळापूर येथील मन मस नदीच्या  संगमावर मुख्य महामार्गावरील पुलावरून गणपती विर्सजन करण्याबाबत व्यवस्था अशी मागणी शांतता कमिटीच्या सदस्यांनी यावेळी केली. याबाबत योग्य कार्यवाही  करण्याचे निर्देश जिल्हा व पोलीस प्रशासनाला पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. बाळापूर येथील गणपती विसर्जनाच्या ठिकाणी मोठे गणपती विर्सजनासाठी  क्रेन , विसर्जन मार्गाची डागडुजी , त्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त, महामार्गावरील वाहतुक नियंत्रीत  करण्यासंबंधी निर्देश पालकमंत्री यांनी दिले आहेत.
अकोला शहरातून गणेश विसर्जनाच्या मार्गातील खड्डे बुजवणे तसेच त्या भागात अडथळा निर्माण करणारे विदयूत वायरींग हटविणे , विसर्जन मार्गावरील मुत्रीची  दुरूस्ती करणे तसेच या मार्गावरील स्वच्छता राखणे आदी विषयाबाबत संबंधीत विभागाला कार्यवाही करण्याचे पालकमंत्री यांनी निर्देश दिलेत. अगरवेस गेटवर  महानगरपालीका मार्फत नविन बांधकाम करण्यात आलेले आहे त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणूकीत मोठया गणपती साठी अडथळा निर्माण होवू शकतो, अशी माहिती  शांतता समितीच्या सदस्यांनी दिली त्यावर पालकमंत्री यांनी सदर अडथळा त्वरीत दुर करावा परंतू कोणतीही अनुचित घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा  सुचना मनपा आयुक्त अजय लहाने यांना दिल्यात. गणेश विसर्जन मिरवणुकीत मर्यादेपेक्षा जास्त मोठी गणपती मुर्तीचा समावेश करू नये याबाबतची काळजी शांतता  समितीच्या सदस्यांनी घ्यावी व पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून विर्सजन मिरवणूक शांततेत पार पडेल याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन  त्यांनी केले. प्रशासनाचे निर्देश आम्ही पुर्णपणे आत्मसात करू त्यांच्या निर्देशाप्रमाणे मिरवणूक दरम्यान अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन गणेश मंडळाच्या वतीने  शांतता समितीचे अध्यक्ष ड. मोतीसिंग मोहता यांनी दिले. यावेळी सिध्दार्थ शर्मा , ड. ठाकूरसह शांतता कमिटीचे सदस्य, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस  प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.