Breaking News

बचतगटाच्या महिलांनी आर्थिक आलेख उंचवावा : डॉ. तनपुरे


राहुरी महिला सक्षमीकरणासारठी साई आदर्श मल्टीस्टेटने घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. या संस्थेकडून महिला बचतगटांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करावा आणि स्वतःसह कुटुंबियांचा आर्थिक आलेख उंचविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा डॉ. उषा तनपुरे यांनी केले.
साई आदर्श मल्टीस्टेटच्यावतीने राहुरी फॅक्टरी येथील महिला बचतगटांच्या महिलांना कर्ज वितरणाचे धनादेश नगराध्यक्षा डॉ. तनपुरे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पंचायत समितीच्या सभापती मनीषा ओहोळ अध्यक्षस्थानी होत्या. साई आदर्श मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, देवळाली नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा ज्योती त्रिभुवन, माजी नगरसेविका प्रमिला कोळसे आदींची यावेळी उपस्थिती होती. डॉ. तनपुरे म्हणाल्या, स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन चाके आहेत. बचतगटांची चळवळ वाढत असल्याने महिलांचे अधिक सक्षमीकरण होत आहे. साई आदर्श मल्टीस्टेटने या चळवळीला बळ देण्यासाठी घेतलेला पुढाकार हा उल्लेखनीय आहे. 

महिलांनी घेतलेल्या कर्जाचा विनियोग योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. जास्तीतजास्त महिलांनी एकत्रित येऊन काम केल्यास ते आणखी सक्षमपणे करता येतील. बचतगटाच्या चळवळीला गालबोट लागू नये, याची काळजी महिलांनी घेतली पाहिजे. व्यवहाराचा आत्मा म्हणून या चळवळीकडे बघितले पाहिजे. त्याची परतफेड योग्य पद्धतीने करून आपला आर्थिक स्थर वाढवण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजीही महिलांनी घेतली पाहिजे. समाजाचे आपण काही देणे लागतो, या उदेशाने साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी जसा बचतगटाच्या चळवळींना बळ देण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे त्यांचा आदर्श घेत अन्य संस्थानीही याकामी पुढाकार घ्यावा. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षा पंचायत समितीचा सभापती ओहोळ म्हणाल्या, संस्था आपल्याला कर्ज देत आहे. मात्र आपण त्याची परतफेड योग्य पद्धतीने करतो की नाही, याकडे महिलांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी परतफेड योग्य पद्धतीने होत नसल्याने संस्था आपल्यामुळे अडचणीत येतात आपण घेतलेल्या कर्जाचा विनियोग हा व्यवसाय सुरु करून आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळून देण्यासाठी करावा.

आदर्श मल्टीस्टेटच्या संचालिका संगीता कपाळे यांनी सर्वांचे स्वागत केले. साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन कपाळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी महिला बचतगटाच्या महिलांना धनादेश वितरीत करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. कांचन शेकोकर, अॅड. सविता ठाणगे, अनिता जाधव, अंजली थोरात, जयश्री पाटील, उमा गीते, प्रतिभा जऱ्हाड, संगीता कोठुळे, सोनिया विजन, श्वेता विजन, चैताली कपाळे, भारती चोरडीया, आशा सोनवणे, कल्पना तनपुरे, प्रतिभा संचेती, वैशाली पवार, स्नेहल भंडारी, ममता छाजेड, अनिता मगर, साई आदर्श मल्टीस्टेटचे संचालक किशोर थोरात, डॉ. विलास पाटील, बाळासाहेब तांबे, विष्णू गीते, अविनाश साबरे आदींसह संचालक मंडळाचे सदस्य, कर्मचारीवृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केले. सुधा खरात यांनी आभार मानले.