Breaking News

रुग्णालयाचा उपजिल्हा दर्जाचा प्रस्ताव पडून


सोलापूर, दि. 08, मे - केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. अद्ययावत यंत्रणेसाठी लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र, प्रशासनाच्या मनमानीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अपघातातील जखमींना तत्काळ सेवा देण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त आरोग्य यंत्रणा उभारत आहे.

अशाप्रसंगी मोहोळसारख्या मध्यवर्ती ठिकाणच्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. केवळ राजकीय अनास्था आणि प्रशासनाचा वेळकाढूपणा यामुळे ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळू शकला नाही. सोलापूरपासून 35 किलोमीटर अंतरावर मोहोळ आहे. येथून पंढरपूर 45 किलोमीटर अंतरावर आहे. शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. या मार्गावर जड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघातही होतात. मराठवाड्यासह कर्नाटकातील भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी याच मार्गाने पंढरपूरला जातात. त्यामुळे प्रवासी वाहनांचीही वर्दळ असते. तालुक्यातील अनेक गावात अद्ययावत रुग्णालये नाहीत. तेथील ग्रामस्थांना उपचारासाठी मोहोळ शहरात यावे लागते. शहरातील ग्रामीण रुग्णालयाची स्थिती बिकट आहे.