Breaking News

वाळूची सर्वत्र खुलेआम विक्री, पोलीस, महसूलची दिलजमाई


सोलापूर, दि. 08, मे - बेकायदा वाळू उपशावर कारवाई करू, असे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्‍यावर कडक कारवाई करू, अशी हमी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली होती. सध्या या दोन्ही विभागाकडून काहीच कारवाई केली जात नसून सर्वत्र वाळूची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. 

यावरून पोलीस आणि महसूल प्रशासन यांच्यात दिलजमाई झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जेव्हा वाळूचा लिलाव होत होता तेव्हा शहरात रस्त्याच्या कडेला वाळूची विक्री होत होती. आता वाळूचा लिलाव नसतानासुध्दा शहरात अनेक ठिकाणी वाळूची विक्री केली जात आहे. विजापूर रोडवरील आयटीआय समोर, शासकीय पॉलिटेक्निकच्या बाजूला, शेळगी पुलाच्या खाली, सग्गम नगर, हनुमान नगर, मड्डी वस्ती, रविवार पेठ आदी अनेक ठिकाणी वाळूचे मोठ मोठे ढिगारे घालून वाळूची विक्री केली जात आहे. मोठमोठ्या अपार्टमेंटच्या आवारात 20-25 ब्रास वाळूची साठवणूक केली जात आहे.