Breaking News

डॉ. सुजय विखेंच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विखेंचा सत्कार

जामखेड / ता.प्रतिनिधी । तालुक्यातील खर्डा येथे जनसेवा फाऊंडेशन व डॉ. विखे पाटील संचलित डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज विळदघाट अ. नगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर सुजय विखे यांच्या हस्ते नायगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. नायगाव नाहुली, देवदैठण, तेलगंशी या चारही गावांनी सुजय विखे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

खर्डा येथील श्री. छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय सोनेगाव रोड खर्डा येथे घेण्यात आले. या मोफत रोग निदान व उपचार शिबिरासाठी ना. राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे आपल्या संपूर्ण वैद्यकिय पथक व सेवा सुविधांसह या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमापुर्वी खर्डा या ठिकाणी सुजय विखे यांची खर्डा गावातुन वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, आर पी आय व भाजप इतर मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी सभेत संबोधन करताना डॉ. सुजय विखे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना या उपक्रमासंदर्भात शुभेच्छा दिल्या. यावेळी मधुकर राळेभात, महालींग महाराज, सुधीर राळेभात यांनी आपले मत व्यक्त केले.

डॉ. सुजय विखे म्हणाले की, कुठलीही समाजसेवा करताना ती मी राजकारण विरहीत करतो, कारण विखे घराण्याची परंपरा चालत आलेली आहे. आपण सर्व सामान्यांच्या कामाला आलो पाहिजे, त्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या पाहिजेत, तसेच जे तुमच्या येथील लोकनियुक्त प्रतिनिधी ने करायला हवे पण ते करत नाही म्हणून मी करतो, पुढेही असेच जामखेड तालुक्यातील सर्व स्तरातील उपेक्षितांचे प्रश्‍न समजून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे यात कुठलाच राजकीय स्वार्थ अथवा तसा प्रयत्न नसून ज्याची गरज आहे ते केले पाहिजे, हा खरा माणूसकी धर्म जपण्याचे काम जसे आजपर्यंत विखे घराण्याने केले, तेच आपण पुढे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सभेनंतर श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय खर्डा येथे घेण्यात येणार्‍या सर्व रोग निदान व उपचार शिबीराची फित कापून त्यांच्यासह तालुक्यातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आले. यावेळी खर्डा येथे अंदाजे 2 ते अडीच हजार रूग्ण महिलांसह नागरिक ग्रामस्थ सर्व पक्षीय कार्यकर्ते व जामखेड तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महालींग महाराज नगरे हे होते यावेळी सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात, सुधीर राळेभात, मधुकर राळेभात, करण ढवळे, बंकटराव बारवकर, मंकरद काशीद, संरपच संजय गोपाळघरे, ज्योती गोलेकर, चंद्रकात गोलेकर, श्रीकांत लोंखडे, मा. सरपंच शिवकन्या इंगले, बोर्ले गावचे सरपंच भारत काकडे, हळगावचे संरपच किसन ढवळे, हनुमंत वराट, राजेंद्र मोटे, सुधीर चव्हाण यांच्यासह महिला ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात हृदय, मेंदू, छातीचे विकार तसेच शरीरावरील गाठी, गोळे, पित्ताशयाचे खडे, मुत्रविकार यावर उपचार करण्यात आले. नेत्र चिकीत्सेत मोतीबिंदू, काचबिंदू, लासूर, रांजनवडी यांवरदेखील उपचार केले जातील. स्त्रीरोगातील गर्भपिशविचे आजार, गर्भाशयाच्या गाठी, पाळीचा त्रास, बालरोगाचे सर्व आजार तसेच हाड मोडणे, संधिवात, सांधे तपासणी केली जाईल अशी माहिती दिली आहे. निवडक आजारासाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना हॉस्पीटल मध्ये उपलब्ध असून त्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड यांच्या सत्यप्रत आणणे आवश्यक आहे, या मोफत रोग निदान व उपचार शिबिराचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल राळेभात यांनी, तर आभार बंकटराव बारवकर यांनी मानले.