Breaking News

काँग्रेसची आज देशव्यापी निदर्शने

नवी दिल्ली : कर्नाटकात सत्तास्थापनेवरून रणकंदन पहायला मिळत आहे. राज्यपाल वजूभाई वाला यांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार्‍या काँग्रेसने आता आंदोलनाचा पवित्रा धारण केला आहे. शुक्रवारी 18 मे रोजी राज्य तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी काँग्रेस निदर्शने करणार आहे. काँग्रेसचे महासचिव अशोक गेहलोत यांच्या सहीनिशी पत्र जारी करण्यात आले आहे. राज्य तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देऊन संविधानाचे एन्काऊंटर केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कर्नाटकच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन करणार असल्याचे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले. कर्नाटकात सुरू असलेला गोंधळ घटना नष्ट करण्यासाठी रचलेला कट आहे. देशात सत्तेत आल्यापासून भाजप सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा घणाघाती आरोप मायावती यांनी केला.