Breaking News

कडूस - वाळवणे रस्त्याचा दर्जा निकृष्ट खाच खलग्यांचा बनविला रस्ता


सुपा / प्रतिनिधी । स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच कडूस-भोयरे गांगर्डा-रुईछत्रपती ते वाळवणे 11 कि.मी चा रस्ता पूर्णावस्थेत आहे. मात्र या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, यावर खाच खलगे, चढउतार मोठ्या प्रमाणात असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे कडूस गावालगत असणार्‍या पुलाचे (डॅम) काम पूर्वीचेच ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी डॅमला मोठे भगदाड पडले असतांना संबंधित ठेकेदाराने त्यावरच डांबरीकरण केले असल्याने येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तर रुईछत्रपती येथे हंगा नदीवर दोन सेतू पुल असताना प्रत्यक्षात जुन्याच पुलाची डागडूजी करुन त्यालाच नवीन नंबरे उभे केले आहेत. तर गावानजिक बाहेरुन जाणारा रस्ता उद्याप डांबरी न करता तसाच ठेवण्यात आला आहे. एकूनच रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा ईशारा राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संतोष गायकवाड यांनी दिला आहे.आ. विजय औटी यांच्या प्रयत्नातून या 11 कि.मी. रस्त्यासाठी 5 कोटी 28 लाख रुपये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले आहेत. त्याचे भूमिपूजन 22 डिसेंबर 2017 रोजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत आ. औटी यांनी कडूस येथे केले. रस्ता पूर्ण करण्याचा कालावधी एक वर्षाचा असतांना अद्याप रूईछत्रपती येथिल रस्ता जैसे थेच असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर खडी व डांबराचा वापर कमी प्रमाणात झाल्याने मोठ्या प्रमाणात खाच खलगेही आहेत.