Breaking News

वाडेगव्हाण ग्रामपंचायतच्या सात जागा बिनविरोध पं.स.चे माजी सभापती गणेश शेळके यांच्या प्रयत्नांना यश

सुपा / प्रतिनिधी ।  पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण ग्रामपंचायतीसह पाच ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणूक अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी वाडेगावातील ग्रामपंचायतमध्ये नाट्यमयरित्या माजी सभापती गणेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली तुकाई माता ग्रामविकास पॅनलचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले. 


वाडेगव्हाण, कान्हूरपठार, मावळेवाडी, यादववाडी, काकणेवाडी या ग्रामपंचायतींचा अर्ज माघारी घेण्याचा बुधवार शेवटचा दिवस होता. त्यापैकी वाडेगव्हाण या ग्रामपंचायतमध्ये सात जागा बिनविरोध झाल्या. 
माजी सभापती गणेश शेळके यांच्या शिस्टाईला यश आले असून, बिनविरोध सदस्य प्रभाग 1 साठी योगेश श्रीरंग रासकर, प्रभाग 3 साठी लतिका बाळासाहेब शेळके, निखिल प्रमोद घनवट, सुरेखा संतोष रासकर प्रभाग 4 साठी उद्धव सुभाष शेळके, मंगल गणपत शेळके, मनीषा अविनाश खंदारे असे आहेत. 
वाडेगव्हाण येथे यापूर्वी शिवसेनेची सत्ता असून आजमितीस मात्र शिवसेनेतच दोन गट पडले असून, माजी सभापती गणेश शेळके माजी सरपंच जयसिंग धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली दोन पॅनलमधून उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते, मात्र अर्ज माघारीच्या शेवटची दिवशी गणेश शेळके यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रयत्नास यश आले. शेळके गटातील वाडेगव्हाण ग्रामपंचायतच्या 11 पैकी 7 जागा बिनविरोध झाल्याने आता उर्वरित 4 जागांसाठी तसेच सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. सरपंच पदासाठी तीन उमेदवार रिंगणात असून गणेश शेळके यांच्या पॅनलकडून बाळासाहेब चंद्रकांत सोनवणे हे उमेदवार असून त्यांच्या विरोधात मंगेश बोरगे, सचिन साळवे यांच्यात लढत होणार आहे. 
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या कान्हूरपठार व वाडेगव्हाण या गावांचा समावेश या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आहे. जि.प. सदस्य आझाद ठुबे यांचे कान्हूर पठार व पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेळके यांच्या वाडेगव्हाण गावाचा या निवडणुकीमध्ये समावेश असल्याने तालुक्याचे लक्ष या गावांकडे लागले आहे.