Breaking News

शहरात अघोषित चलनबंदी, एटीएम केंद्रांत खडखडाट


सोलापूर, दि. 02, मे - बँका सलग चार दिवसांच्या सुटीवर असल्याने शहरात सर्व एटीएम केंद्रे ओस पडली. 80 टक्के केंद्रांमधील पैसे संपुष्टात आले. शहरात अघोषित चलनबंदीच असल्यासारखी स्थिती निर्माण झाली. अधिकार्‍यांनी सुटीत नियोजन करणार असल्याचे सांगितले होते. पण त्याचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. 28 एप्रिलला चौथ्या शनिवारपासून बँकांना सुट्या सुरू झाल्या. 

सोमवारी बुद्धपौर्णिमा आणि मंगळवारी महाराष्ट्र दिनाची सुटी घेऊन बँका उघडतील. या चार दिवसांच्या कालावधीत एटीएम केंद्रामध्ये पुरेशा पैशांची व्यवस्था होणे आवश्यक होते. पैसे भरणारी यंत्रणा ही खासगी आहे. बँका बंद असल्याने संबंधित एजन्सींना पैसा देणार कोण? हा प्रश्‍न आहे. स्टेट बँक, बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाने त्याची जबाबदारी घेतली होती. परंतु त्यांच्याही एटीएम कें द्रांमध्ये नया पैसा नाही. अर्ध्यावर ओढून ठेवलेले शटरच पाहायला मिळत आहेत. सुट्या असल्याने प्रवासी वाढले. रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी काही बँकांची एटीएम केंद्रे आहेत. तेही कोरडीठाक पडली. वेळेत गाडी पकडण्याची घाई असलेल्या प्रवाशांना पळापळी करावी लागत आहे. अन्यत्र फिरूनही पैसे मिळत नसल्याने हतबल होत आहेत.